ओएलएक्सवरील जाहिरात पाहून एखादी वस्तू खरेदी करताना तुमची फसवणूक होत नाही ना याची खात्री करा, कारण वडगाव शेरी येथील एका अभियंत्याला ओएलएक्सवरील जाहिरात पाहून एलईडी खरेदी करणे चांगलेच महागात पडले आहे. त्याला विविध कारणांसाठी खात्यावर पैसे भरायला लावून ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी देखील या संकेतस्थळाच्या जाहिरातीवरून नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.
वडगाव शेरीतील वृंदावननगर येथे राहणारे अमित पंढरीनाथ बेंडभर यांची अशा प्रकारे फसवणूक झाली. अमित हे हडपसर येथील एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरीला आहेत. २० मे रोजी त्यांनी त्यांच्या मोबाईलवर ओएलएक्सवर सोनी कंपनीच्या एलईडीची एक जाहिरात पाहिली. त्यांना जाहिरात आवडल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्या वेळी त्यांना सवलतीमध्ये ५५ इंचाचा सोनी कंपनीचा एलईडी हा ३२ हजार रुपयांत मिळेल, असे सांगण्यात आले. त्यांना ईमेलवरून एलईडीची सर्व माहिती पाठवून सोळा हजार रुपये एका खात्यावर भरण्यास सांगितले. त्यानुसार अमित यांनी हडपसर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यावरून त्यांना सांगितलेल्या खात्यावर सोळा हजार रुपये भरले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मार्क नावाच्या व्यक्तीला फोन केल्यानंतर डिलिव्हरी बॉय संपर्क करेल, असे सांगितले.
अमित यांना जॉन नावाच्या डिलिव्हरी बॉयने फोन करून एलईडी घेऊन मुंबई विमानतळावर आल्यानंतर सीमा शुल्क विभागाने पकडल्याचे सांगितले. टीव्हीचा क्लिअरन्स व नोंदणीसाठी १८ हजार ५०० रुपये भरावे लागतील. ती रक्कम भरण्यासाठी अमित यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी ती रक्कम भरली. त्यानंतर सीमा शुल्कवाले कंपनीचे ‘ मार्केट व्हॅल्यु सर्टीफिकेट’ मागत असून ते नसल्याने उद्या मालाची डिलिव्हरी करतो, असे मार्कने अमित यांना सांगितले. तिसऱ्या दिवशी सकाळी अमित यांना मार्कचा फोन आला. सीमा शुल्क विभाग मालाची किंमत पडताळण्यासाठी साडेपंचवीस हजार रुपये भरण्यास सांगत आहे, ते पैसे भरले नाहीत तर वस्तू तुम्हाला पाठवू शकत नाहीत, असे मार्कने अमित यांना सांगितले. त्यावरून अमित यांनी मार्कशी वाद घालून पैसे परत मागितले. पण, पैसे देण्यास नकार दिल्याने शेवटी अमित यांनी सांगितलेल्या खात्यावर साडेपंचवीस हजार रुपये भरले. त्या दिवशी शनिवार असल्याचे सांगत त्यांना एलईडी पाठविलाच नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी मार्कचा पुन्हा फोन आला. सीमा शुल्क विभागाला आणखी ३४ हजार रुपये भरावे लागतील. ते न भरल्यास दिवसाला दहा हजार रुपये दंड द्यावा लागेल, असे सांगितले. तुम्ही भरलेली रक्कम तीन दिवसात तुमच्या बँक खात्यावर जमा होईल, असे मार्कने सांगितले. त्यानुसार अमितनी पुन्हा खात्यावर पैसे भरले. त्यानंतर पुन्हा मार्कचा फोन आला की, मला पोलिसांनी पकडल्यामुळे एलईडी पाठविता आला नाही. अमित यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पुणे शहर पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार केली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित यांनी पैसे मिळवून देण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा