पुणे : कोकणात जमीन खरेदीच्या आमिषाने लष्करी अधिकाऱ्याची ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी लष्करातील एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लेफ्टनंट कर्नल प्रताप रजनीश सिंग (वय ४९, रा. श्रीनिवास क्राॅस काऊंटी, वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लेफ्टनंट कर्नल डी. एस. पाटील (वय ५८, रा. नाॅटिंग हिल्स, चऱ्होली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंग हे सध्या ओदीशात नियुक्तीस आहेत. सिंग २०१५ ते २०१८ या कालावधीत खडकीतील बाॅम्बे सॅपर्समध्ये नियुक्तीस होते. त्यावेळी त्यांची ओळख लेफ्टनंट कर्नल डी. एस. पाटील यांच्याशी झाली. त्यांनी सिंग यांना काेकणात जमीन खरेदी करून देताे, असे आमिष दाखविले होते. त्यानंतर सिंग यांनी पाटील यांच्या बँक खात्यात जमीन खरेदीसाठी ३७ लाख रुपये जमा केले. पाटील यांना पैसे दिल्यानंतर त्यांनी जमीन खरेदी करून दिली नाही. त्यांच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा पैसे परत देण्यास त्यांनी टाळाटाळ केली, असे सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक गौरी झोरे तपास करत आहेत.