लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयात पहिलीत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची एक लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे परत मागितल्याने आरोपीने तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत एकाने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजित रामकृष्ण घाटपांडे (रा. शीतल प्लाझा, कात्रज-कोंढवा रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची आरोपी घाटपांडे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. खडकवासला परिसरातील गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात मुलीला पहिलीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखविले होते. तक्रारदार घाटपांडेला वारजे भागातील एका हॉटेलमध्ये भेटले. तक्रारादारकडून एक लाख ४३ हजार रुपये घेतले. तक्रारदारासह त्यांच्या ओळखीतील आणखी काहीजणांनी घाटपांडेला पैसे दिले होते.

आणखी वाचा-मी पाणबुडी बनवतो का? कोल्हे यांनी दिलेल्या पुराव्याचा आणि ‘त्या’ आरोपाचा काही संबंध नाही- शिवाजीराव आढळराव पाटील

पैसे घेतल्यानंतर त्याने प्रवेश मिळवून न दिल्याने तक्रारदाराने पैसे परत मागितले. पैसे परत देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदाराने घाटपांडेला जाब विचारला. तेव्हा ‘मी तुम्हाला संपवून टाकेल किंवा मी आत्महत्या करेल’, अशी धमकी घाटपांडेने त्यांना दिली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीळकंठ जगताप तपास करत आहेत

घाटपांडेने केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating with lure of admission to kendriya vidyalaya accused threatens to kill for demanding money back pune print news rbk 25 mrj