दत्ता जाधव, लोकसत्ता
पुणे : शहरांमध्ये गुळाच्या चहाची दुकाने थाटली जात आहेत. साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा आरोग्यासाठी चांगला म्हणून गुळाच्या चहाला लोकांची पसंती मिळत आहे. पण, वास्तव काही वेगळेच आहे..
राज्यात १०० टक्के सेंद्रिय गुळाचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या तुलनेत एक टक्काही होत नाही. रसायनमुक्त गुळाचे प्रमाणही पाच टक्क्यांहून अधिक नाही. त्यामुळे चहासाठी वापरला जाणारा गूळ बहुतेक करून रासायनिकच असतो.
राज्यातील गूळ व्यवसाय संघटित नसल्यामुळे नेमके उत्पादन किती होते याची माहिती मिळत नाही. कोल्हापुरात दरवर्षी ३० किलोच्या साधारण १९ लाख ढेपा (रवे) तयार होतात. सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पादन केले आणि त्यापासून सेंद्रिय पद्धतीने गूळ तयार केला तरच तो १०० टक्के सेंद्रिय गूळ असतो. अशा १०० टक्के सेंद्रिय गुळाचे उत्पादन एकूण गुळाच्या उत्पादनापैकी एक टक्काही होत नाही. रसायने न वापरता तयार केलेला गूळच सेंद्रिय म्हणून विकला जातो. या गुळाचे उत्पादनही पाच टक्क्यांहून अधिक नाही. कराड, शिराळा आणि कोल्हापूरमध्ये काही प्रमाणात रसायनमुक्त गूळ तयार होतो. पण, रसायने, रंग वापरून गूळ तयार करण्याचे प्रमाण जास्त आहे. हाच गूळ चहासाठी सर्रास वापरला जातो.
गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून होणारी गुळाची आवक बंद झाली आहे. कराड, शिराळा, कोल्हापूरमधून चांगल्या दर्जाच्या गुळाची आवक होते, असे मार्केट यार्डमधील गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले. तर महापुराचा फटका बसल्याने यंदा कोल्हापुरातील गुळाचा दर्जा खालावला आहे, अशी माहिती कोल्हापूर येथील गूळ व्यापारी निमीश वेद यांनी दिली.
सेंद्रिय गुळाला बाजार समितीत चांगला दर मिळत नाही, त्यामुळे तो फारसा तयार होत नाही. कमी रसायने घालून किंवा रसायने न घालता तयार केलेला गूळ सेंद्रिय म्हणून विकला जातो. ग्राहकांच्या मागणीनुसार रंग घालून केशरी, जिलेबी रंगाचा गूळही तयार केला जातो.
–निमीश वेद, गूळ व्यापारी, कोल्हापूर
गुळामध्ये भेसळ वाढली आहे. यापूर्वी गूळ सहा सहा महिने टिकायचा. आता भेसळीमुळे गूळ काळा पडणे, बुरशी येणे, असे प्रकार होत आहेत. सेंद्रिय गुळाचे उत्पादन खूपच कमी होते.
–जवाहरलाल बोथरा, गुळाचे व्यापारी, पुणे मार्केट यार्ड
फसवणूक अशी..
’गुळाला चांगला रंग यावा, तो काळसर दिसू नये म्हणून फॉस्फरस, सल्फरडाय ऑक्साईड आणि मागणीनुसार रंगांचा वापर केला जातो.
’साखर स्वस्त आणि गूळ महाग असल्याने गूळ तयार करताना साखरेची भेसळ केली जाते. ’सामान्य लोकांना उपलब्ध असलेल्या गुळात कमी-जास्त प्रमाणात फॉस्फरस, सल्फरडाय ऑक्साईड आणि रंगाचा समावेश असतोच.