लोकसत्ता प्रतिनिधी
लोणावळा: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अपघात होऊन टँकर रस्त्यामध्ये पलटी झाला व टँकरला भीषण आग लागल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट उसळले आहेत. ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कोणेगाव पुलाजवळ घडली आहे.
या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर कोणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली. त्यामध्ये चार जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. “मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.