औषध विक्रेत्या दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीच्या मुद्दय़ावरून औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी पुकारलेला बंद उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला. तरीही सोमवारी दिवसभर शहरातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची औषधांसाठी प्रचंड गैरसोय झाली.
या बंदमध्ये सहभागी होणाऱ्या औषध विक्रेत्यांवर ‘मेस्मा’अंतर्गत (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व परिरक्षण कायदा) कारवाई करू, अशी तंबी शासनाने देऊनही औषध विक्रेत्यांनी सोमवारी दिवसभर दुकाने बंदच ठेवली. केवळ मोठय़ा रुग्णालयांमधील चोवीस तास उघडी राहणारी औषध दुकानेच सुरू असल्यामुळे या दुकानांपुढे औषधे खरेदीसाठी रुग्णांच्या नातेवाइकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ग्राहकांची संख्या मोठी असल्यामुळे अनेकांना औषधांसाठी तासंतास ताटकळत उभे राहावे लागले असल्याचेच चित्र शहरात दिसले.
‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’चे (सीएपीडी) अध्यक्ष संतोष खिंवसरा म्हणाले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून आम्ही संप मागे घेतला आहे. औषध दुकानात फार्मासिस्ट उपस्थित नसताना किंवा इतर काही त्रुटी आढळल्यावर एफडीएकडून जागेवर ‘स्टॉप सेल’ नोटिसा देणे, दुकान बंद करण्यास सांगणे या गोष्टी केल्या जाऊ नयेत, ‘ओव्हर द काऊंटर’ (ओटीसी) विकता येण्याजोग्या औषधांची यादी जाहीर करण्यात यावी, शेडय़ूल- के औषधांबाबतची भूमिका स्पष्ट करावी या मागण्यांसंबंधी औषध विक्रत्यांनी न्यायालयाकडे दाद मागितली होती. आता १९ डिसेंबरला शासनस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक होणार असून त्यावर २४ तारखेला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.’’
औषधांसाठी दिवसभर रुग्णांना मनस्ताप
औषध विक्रेत्या दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीच्या मुद्दय़ावरून औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी पुकारलेला बंद उच्च न्यायालयाच्या सूचनेवरून पहिल्याच दिवशी मागे घेण्यात आला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 17-12-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemists and drugists strike called off