पावलस मुगुटमल, लोकसत्ता
पुणे : देशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी एक असलेल्या मेघालयातील चेरापुंजी येथे हंगामाच्या पहिल्या तीनच आठवडय़ात तब्बल ४७६० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. गेल्या काही वर्षांत दोन ते तीन वेळा चेरापुंजीलाही पावसात मागे टाकत आघाडी घेणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मात्र या कालावधीत केवळ १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली . त्यामुळे चेरापुंजीची पावसातील आघाडी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
मेघालयातील चेरापुंजी आणि महाराष्ट्रातील घाट विभागातील महाबळेश्वर यांची तुलना कधी होत नव्हती. मात्र, २०१८, २०१९ या दोन वर्षांमध्ये एकूणच मेघालयात आणि चेरापुंजीत पावसाचे प्रमाण घटले होते. त्याच काळात महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या तुलनेत मोठा पाऊस झाला. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात महाबळेश्वर चेरापुंजीच्या स्पर्धेत आले होते. याच कालावधीत पुणे जिल्ह्यातील ताम्हिणीतील घाटक्षेत्रातील पाऊसही चर्चेत आला होता. महाबळेश्वरमध्ये २०१८ मध्ये हंगामाच्या सुरुवातीच्या दोनच महिन्यांत ५७०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या काळात चेरापुंजीत तीन हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस होता. २०१९ मध्ये महाबळेश्वरमध्ये सात हजारांहून अधिक मिलिमीटर पाऊस झाला होता. या काळातही चेरापुंजीचा पाऊस कमी होता. हंगामाच्या शेवटपर्यंत या वर्षांत महाबळेश्वरच्या पावसाने आघाडी कायम ठेवली होती. यंदा मात्र एकूणच महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. मोसमी पाऊस दाखल होऊनही तो पुरेशा प्रमाणात बरसत नाही. हंगामाच्या सुरुवातीपासून अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचा वेग कमी आहे. त्याचा फटका महाबळेश्वरच्या पावसालाही बसला आहे. यंदा हंगामाच्या पहिल्या तीन आठवडय़ांत येथे केवळ १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या तुलनेत साडेतीनशे मिलिमीटरहून कमी आहे.
मेघालय आणि महाराष्ट्र..
मेघालय आणि चेरापुंजीत यंदा विक्रमी पाऊस होतो आहे. चेरापुंजीत २४ तासांत ८५० मिलिमीटरहून अधिक पावसाचा विक्रमही यंदा नोंदविला गेला. मॉसिनराम येथेही यंदा २४ तासांतील सर्वाधिक पावसाचा विक्रम झाला आहे. पहिल्या तीन आठवडय़ांत ४७६० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत तीन हजार मिलिमीटरपेक्षा अधिक आहे. यातील सर्वाधिक पाऊस गेल्या दहा दिवसांत झाला आहे. चेरापुंजीचा समावेश असलेल्या पूर्व खासी हिल्स या जिल्ह्यात २१० टक्के अधिक, तर महाबळेश्वरचा समावेश असलेल्या सातारा जिल्ह्यांतील पाऊस ७४ टक्के उणा आहे.
थोडी माहिती..
भारतामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून चेरापुंजी हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. अलीकडच्या काही वर्षांमध्ये मेघालयातील मॉसिनराम या ठिकाणानेही देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळख मिळविली आहे.
१७ राज्यांत पाऊस उणा
महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमध्ये हंगामाच्या पहिल्या टप्प्यात पाऊस उणा आहे. महाराष्ट्रात अद्यापही सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के पाऊस कमी आहे. उत्तर, प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. गुजरात, दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओडिसा, गोवा, छत्तीसगड, कर्नाटक आदी राज्यांतही पावसाचे प्रमाण कमी आहे.