पुणे : जगातील सर्वांधिक पर्जन्यवृष्टी होणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीमध्ये रविवारी उच्चांकी ३३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ६ सप्टेंबर १९६९ रोजी ३१.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. ईशान्य भारताला उष्णतेच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत असून, तापमान वाढीमुळे शाळांना चार दिवसांची सुटी देण्यात आली आहे.

मेघालयातील चेरापुंजी येथे रविवारी ३३.१ आणि सोमवारी ३२.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात चेरापुंजी येथे सरासरी कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस असते. यंदा प्रथमच पारा ३३.१ अंशांवर गेला आहे. उष्णतेच्या वाढत्या झळांमुळे लहान मुलांना त्रास होत असल्यामुळे आसाम सरकारने काही जिल्ह्यांत २७ सप्टेंबरपर्यंत शाळांना सुट्टी घोषित केली आहे. आसामची राजधानी गुवाहटी येथे पारा ३९.६ अंशांवर गेला आहे. मागील तीन दिवसांपासून मेघालयची राजधानी शिलाँग, चेरापुंजी आणि हवामान केंद्र असलेल्या सोरा येथे कमाल तापमान २९.९ ते ३२.५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

हेही वाचा – VIDEO : तोडफोडीचे सत्र सुरूच: पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांत २७ वाहनांची तोडफोड

चेरापुंजीतील पर्यटनाला फटका

समुद्रसपाटीपासून १५०० मीटर उंचीवर वसलेले चेरापुंजी पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. सप्टेंबरमधील सरासरी तापमानापेक्षा ९.३ अंश सेल्सिअसने तापमान जास्त आहे. सप्टेंबरमध्ये चेरापुंजीत थंड वातावरण असते. पण, पारा ३३ अंशांवर गेल्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. गुवाहटी येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गुवाहटी, दिब्रुगड, जोराहट, उत्तर लखमीपूर तापमान वाढीचा मोठा फटका बसत आहे.

हेही वाचा – चिकुनगुन्याचा धोका वाढताच राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

चेरापुंजी येथील सप्टेंबरमधील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये. स्त्रोत. आयएमडी)

८ सप्टेंबर २०१२ – ३०.०
१८ सप्टेंबर २०१५ – ३०.६
२७ सप्टेंबर २०२१ – ३०.७
६ सप्टेंबर १९६९ – ३१.१
२२ सप्टेंबर २०२४ – ३३.१