पुणे : ‘तेलगी प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना शरद पवार यांनी माझा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला. मात्र, त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये माझ्यावरील कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांनी माझा राजीनामा घेण्याची घाई केली,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येथे केला. ‘सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या भाजपबरोबर आहोत. मात्र, आम्ही भाजपबरोबर लग्न केलेले नाही,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात आठव्या युवा संसदेमध्ये ‘संसद कट्टा’ अंतर्गत भुजबळ यांची मुलाखत ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांनी घेतली. त्यानंतर संस्थेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते.
‘सन २०१४ मध्ये शरद पवार यांनी भाजपला बाहेरहून पाठिंबा दिला. त्यानंतर अनेक वर्षे भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात पक्षाची भूमिका तळ्यात-मळ्यात होती. मात्र, मी अजित पवार यांच्यासमवेत राहण्याचा निर्णय घेतला. सध्या राष्ट्रवादी पक्ष राजकीय दृष्ट्या भाजपबरोबर आहे.’ असे भुजबळ यांनी सांगितले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळे मी सर्वसामान्य भाजी विक्रेता असतानाही राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर मंडल आयोगाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे मी शिवसेनेतून बाहेर पडलो. मी जर शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो, तर त्याचवेळी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. शरद पवार यांच्यासोबत गेल्यावरही मुख्यमंत्री होण्याची संधी होती. मात्र, ओबीसींच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या दोन संधी सोडून दिल्या. माझ्यासाठी पद महत्त्वाचे नाही तर, ओबीसी समाजाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी मी पद नसतानाही लढत राहणार आहे.’ असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून असणारा मी ज्येष्ठ नेता आहे. अजित पवारांसमवेत गेल्यानंतरही मला मंत्रिपद मिळाले नाही, याची खंत वाटते. मला मिळणारे पद महत्त्वाचे नाही. मात्र, मानसन्मान मिळाला नाही, तर माणूस दु:खी होतो, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली.
‘राज्यपाल होणार नाही’
राज्यपाल होऊन सर्वसामान्यांसाठी मी बोलू शकणार नाही. मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मी हे पद स्वीकारणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये ओबीसींच्या बाजूने भूमिका घेतल्याने मराठा समाजाच्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा फटका बसला आणि विधानसभा निवडणुकीत माझे मताधिक्य कमी झाले. मात्र, त्यानंतरही मी ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनामध्ये माझा वापर करून घेतला असे अनेकांना वाटते. मात्र माझा कोणीही वापर करू शकत नाही आणि मी तो करून देणार नाही, असेही भुजबळ म्हणाले.