राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देशात सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं विष पसरवू नये, असं आवाहन केलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर छगन भुजबळ पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले, “शिक्षण क्षेत्रात मग ते शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ असो दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं विष पसरवू नये. विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवलं पाहिजे.”
“माणसात धर्म राज्य भेद असता कामा नये”
“महात्मा फुले यांनी माणसात धर्म राज्य भेद असता कामा नये असं म्हटलं होतं. सर्वांनी शांततेत एकत्र राहिलं पाहिजे आणि समाजाची, देशाची प्रगती केली पाहिजे. जाती धर्मात लढाया नको. महात्मा जोतिबा फुले यांनी आम्हाला तसं शिकवलं आहे,” असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.
“भेदाभेद, राग, द्वेष निर्माण केला तर मग शिक्षणाचा काय फायदा?”
छगन भुजबळ म्हणाले, “करोनाचा संसर्ग आता कोठे नियंत्रणात येऊन शाळा महाविद्यालयं सुरू होत आहेत. अशावेळी आपण मुलांना काय शिकवतो. या वयात मुलांच्या मनात अशाप्रकारचे भेदाभेद, राग, द्वेष निर्माण केला तर मग शिक्षणाचा काय फायदा? शिक्षणाचा हेतू समाजाला, देशाला एकत्रित येऊन पुढे घेऊन जाण्याचा आहे. अशात अशाप्रकारचे वाद वाढणार असतील तर चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही भांडणं, वाद शैक्षणिक ठिकाणी करू नये.”
“भेदाभद करणारे राजकारणीच जास्त असतात”
“भेदाभद करणारे राजकारणीच जास्त असतात. सर्व राजकारण्यांना आवाहन आहे की विद्यार्थ्यांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होता कामा नये,” असंही भुजबळ यांनी नमूद केलं.
हेही वाचा : “पीडित महिला आणि वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार शिधापत्रिका”, मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एस.एन. उमराणी आदी उपस्थित होते.