लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, असेच आमचे म्हणणे आहे. ईडब्ल्यूएससाठी १० टक्के आरक्षण आहे. तरीही त्रास दिला जात आहे. माझ्या निवडणुकीत येऊन त्या सद्गृहस्थाने बैठका घेतल्या. मात्र सर्वांनी एकजुटीने मला मतदान केले. निवडणुकीत जात आणण्याचे कारण काय, एवढ्या वर्षांनीही महाराष्ट्राच्या वाट्याला हेच आहे का, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्कार भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, समीर भुजबळ, माजी मंत्री दिलीप कांबळे या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-पुणे : बंदुकीच्या दुकानातून २० काडतुसे, ३२ बोअरची चोरी, दोघांना गुन्हे शाखेकडून बेड्या
भिडेवाडा येथील काम लवकरच पूर्ण
भुजबळ म्हणाले, की चित्रपट करणारे, कविता करणारे खूप आहेत. पण नागराज यांनी सामाजिक प्रश्नांवर चित्रपट, कवितांतून भाष्य केले आहे. आजच्या काळात कितीही संकटे आली, तरी थांबता येणार नाही. सर्वच सुशिक्षित सुसंस्कृत असतात असे नाही, काही अशिक्षितही सुसंस्कृत असतात. भिडेवाडा स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महात्मा फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागासवर्गीय, ओबीसींनी आपल्या हक्कासाठी उभे राहिले पाहिजे. आता घाबरून जाऊन चालणार नाही. महापुरुषांनाही त्यांच्या काळात विरोध झाला होता. महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांचे वारसदार म्हणून सर्वांना सोबत घेऊनच काम करायचे आहे.
आणखी वाचा-टाटा समूहात नोकरीची संधी! वॉक-इन इंटरव्ह्यूचे वेळापत्रक अन् इतर निकष जाणून घ्या…
विचार घेऊन पुढे जाणारेच खरे उत्तराधिकारी
महात्मा फुले यांची ओळख झाली नसती तर आज इथेवर पोहोचलो नसतो. महापुरुष जातीत वाटून घेतल्यावर जगण्याला अर्थ नाही. जातींमधील संकुचितपणाला अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले पूर्वज आहेत असेच सर्वांनी मानले पाहिजे. विचार पुढे घेऊन जाणारे खरे उत्तराधिकारी असतात, जातीत किंवा पोटी जन्माला येऊन पुरेसे नाही. फुले आंबेडकर नसते तर आजचे जगणे शक्य नसते. लोकांनी भक्त, अनुयायी, ग्राहक होऊन राहावे अशी व्यवस्थेची इच्छा असते. मात्र आपले हक्क मिळवायचे असतील, डोळसपणे पाहायचे असल्यास वाचन करणे गरजेचे आहे, असे मत नागराज मंजुळे यांनी मांडले.