लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘आपण इतिहास विसरत चाललो आहोत. महात्मा फुले यांचे लेखन हे त्या वेळच्या कर्मठ ब्राह्मणांविरोधात आहे. त्यांचा लढा ब्राह्मणांविरोधात नाही, तर ब्राह्मण्याविरोधात आहे. हे जाणून घेण्यासाठी ‘फुले’ चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे. जातीयवाद करून इतरांना कमी लेखणाऱ्यांसाठी हा चित्रपट आवश्यकच आहे. चित्रपटाला अनाठायी विरोध करण्यापेक्षा त्या वेळचा इतिहास समजून घेतला पाहिजे,’ अशी भूमिका महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मांडली.
राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाडा येथे झालेल्या कार्यक्रमात ‘समग्र महात्मा जोतिबा फुले’ आणि ‘समग्र सावित्रीबाई फुले’ या ग्रंथांचे प्रकाशन छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि आमदार हेमंत रासने या वेळी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महात्मा फुले यांना विरोध करण्यामध्ये केवळ कर्मठ ब्राह्मणच नव्हते, तर आमच्यातील काही अंधश्रद्ध लोकही होते. फुले यांना मदतही काही ब्राह्मणांनीच केली होती. समाजामध्ये आता प्रचंड बदल होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. तरी इतिहास जाणून घेतलाच पाहिजे. महिला आज सर्व क्षेत्रांत यश संपादन करत आहेत, त्याची सुरुवात इथून झाली. फुले यांचा लढा ब्राह्मणांविरोधात नाही, तर ब्राह्मण्याविरोधात आहे. आचार्य अत्रे यांनी फुले यांच्यावर ‘महात्मा’ चित्रपट निर्माण केला, त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांच्या कार्यावर आधारित ‘सत्यशोधक’ चित्रपट निघाला. आताही ‘फुले’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली आहे. ‘आम्ही कोणतेही स्वातंत्र्य घेतले नाही’ असे फुले चित्रपटाच्या निर्मात्यांनी मला सांगितले.’
‘महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह या वास्तू एकाच प्रांगणात याव्यात, यासाठी फार प्रगती होऊ शकलेली नाही. त्यासाठी जागा देण्यास येथील नागरिक तयार आहेत. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन्ही ‘दादां’नी त्यामध्ये पुढाकार घ्यावा,’ असे आवाहनही भुजबळ यांनी केले. शरद पवार मुख्यमंत्री असताना समग्र फुले वाङ्मय प्रकाशित झाले होते. आता फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याचे पुन्हा प्रकाशन होत आहे, याचा आनंद असल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.
‘दोनशे कोटी देऊनही भूमी अधिग्रहण होऊ शकले नाही. १७ तारखेला आयुक्तांबरोबर बैठक घेऊन महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करू,’ असे पाटील म्हणाले. ‘प्रकाशित झालेल्या ग्रंथाची छापील किंमत ४०० रुपये असली, तरी सवलतीच्या दरामध्ये ५० रुपयांना ग्रंथाची विक्री केली जाणार आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
महात्मा फुले यांनी त्यांच्या लेखनातून सत्य मांडले. सत्य लपवून काही होत नसते. त्यांनी जो प्रगत विचार मांडला होता, तो सर्वांनी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.-चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री