पुणे : गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाच्या बाबतीत मोठे वादळ उठवले जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच भूमिका आहे. येत्या काही दिवसात त्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या नव्या कायद्यालाही पाठिंबा आहे. मात्र आरक्षण देताना लहान-मोठ्या समाजघटकांना बरोबर घ्यावे लागेल. त्यांना दुखविता येणार नाही, असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे सांगितले.
अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर अल्पसंख्यांक, भटके-विमुक्त, आदिवासी यांची शक्ती बरोबर घ्यावेच लागेल. त्यानंतरच विजयाचा मार्ग सुकर होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जत-जामखेडचे आमदार स्वतःला युवकांचा नेता म्हणवितात. मात्र त्यांच्या अवतीभोवती पगारी नोकर आहेत, अशी टीकाही त्यांनी रोहित पवार यांच्यावर केली.
हेही वाचा…देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम पुण्यात
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मिशन हा मेळाव्याचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले आहे. त्यावेळी भुजबळ यांनी युवा वर्गाशी संवाद साधला. पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी, आमदार यावेळी उपस्थित होते. एकमेकांच्या विचाराने काम करा. खेकड्याची प्रवृत्ती सोडा, अशी सूचना त्यांनी केली. राज्यातील युवा वर्ग अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आला आहे. त्याचा विचार जुन्या मित्रांनी आणि नेत्यांनी केला पाहिजे. पुनर्विचार करता येत नसेल तर थांबायला पाहिजे. विनाकारण टीका करण्यापेक्षा बोलणे थांबविले पाहिजे, अशा शब्दात भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
ते म्हणाल की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून माझे योगदान मोठे आहे. पक्ष चिन्ह करण्यातही माझा वाटा होता. पक्ष संघटनही आम्ही मोठे केले. त्यामुळेच अजित पवार यांच्या मागे लोक आणि कार्यकर्ते उभे राहिले. सत्तेमध्ये जायचे असेल तर लोकांचा पाठिंबा लागतो. तो अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे कायदेशीर निर्णयही अजित पवार यांच्या बाजूने लागला आहे. मात्र पक्ष चोरून नेला, अशी टीका काही जण सतत करत आहेत. मात्र लोकशाहीत लोक, पक्ष आणि कार्यकर्ते जो निर्णय घेतात तो मान्य करावा लागतो. तो आमच्या बाजूने लागला तर कोणाला दुःख वाटण्याचे काही कारण नाही. पक्ष आम्ही मोठा केला. तो वाढविला. त्याचे संघटन मजबूत केले. त्यामुळे लोकांनी आणि कायद्यानेही आमच्या बाजूने निर्णय दिला.
हेही वाचा…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण संजय राऊत? फार मोठे…
तरुणांनी भूमिका घेतली तर, सरकार दरबारी त्याची दखल घ्यावी लागते. आत्ताचे राजकारण तरुणांच्या हाती आहे. समाजमाध्यमे, मोर्चा, मेळावे, सभा आणि प्रत्यक्ष लोकसेवेच्या माध्यमातून तरूण वर्गाला काम करावे लागणार आहे. संघटन मजबूत असेल तर पक्ष मजबूत होतो. तरुणांचे संघटन पक्षाचा पाया आहे. तरुणांच्या जीवावरच राजकारण करता येईल. येथे जमलेले तरूण स्वयंस्फूर्तीने आले आहेत. कर्जत जामखेडचे आमदार स्वतःला तरूणांचा नेता म्हणवितात. मात्र त्यांच्या अवतीभोवती पगारी नोकरादार असतात, अशी टीका त्यांनी केली.
निवडणुका तोंडावर आल्या आहेत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना कष्ट करावे लागणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणी काय काम केले, यावरच पुढील निवडणुकीत त्याला उमेदवारी देण्याचा विचार होईल. त्यामुळे एकमेकांचे पाय ओढणे बंद करा, बरोबरीने काम करा. खेकड्याच्या वृत्तीने वागू नका. एकमेकांना सहकार्य करा. संकट, अडचणी येणार आपलेचे लोक आरोप करतील. मात्र त्याकडे दुर्लक्ष करा. शिवसेनेबरोबर असतानाही शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा सोडली नव्हती. आता भाजपबरोबर असतानाही ती कायम राहिल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.