लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘सरकारमधील घटक पक्षाचा मी एक आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. अन्य कोणत्या जबाबदाऱ्या असत्या, तर थोडी अडचण आली असती,’ अशा शब्दांत मंत्रिपद न मिळाल्याची खंत बोलून दाखवितानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिला.
महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महात्मा फुले स्मारकाच्या ठिकाणी सभा घेण्यास जागा नाही. जागा मिळविण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करावे लागले. प्रयत्न करूनही त्याला यश येताना दिसत नाही. स्मारकाच्या कामाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका आहे. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी स्थानिकांशी संवाद साधून जागा मोकळी करून घेणे आवश्यक आहे. अन्य ठिकाणी जमीन अधिग्रहण ज्या पद्धतीने केले जाते, ती पद्धत येथे नाही. त्यामुळे जागा ताब्यात घेण्याचा वेगही संथ आहे. भूसंपादनाबाबत महापालिकेचे अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. त्यामुळे रखडलेल्या कामामध्ये प्रगती न झाल्यास आंदोलन करावे लागेल.’
सरकारमध्ये असतानाही आंदोलन का करावे लागत आहे, असा प्रश्न भुजबळ यांना विचारला असता, ते म्हणाले, ‘या गोष्टी सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. आंदोलन का करावे लागेल, हा प्रश्न या ठिकाणचे मंत्री, पालकमंत्र्यांना विचारावा लागेल. मी फक्त सरकारमधील एका घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. माझ्यावर अन्य कोणत्या जबाबदाऱ्या असत्या, तर थोडीशी अडचण आली असती.’