भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांची माहिती

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेतून लिहिणार आहेत. त्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून विविध पुस्तकांचा अभ्यास त्यांनी सुरू केला आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी येथे दिली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लिखित आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या ‘भारतीय जनता पक्ष राजकारणात कशासाठी?’ या पुस्तिकेच्या मराठी, हिंदूी आणि इंग्रजी आवृत्तींचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, कार्यकारी संचालक रवींद्र साठे यावेळी उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाले, ‘अमित शाह हे पक्ष बांधणी आणि संघटनासाठी झटणारे नेते आहेत. त्यामुळेच भाजपचे विचार, हा पक्ष सत्तेमध्ये का आला हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही पुस्तिका लिहिण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही ते त्यांच्यावर गुजरातीमधून पुस्तक लिहिणार आहेत. महाराजांचे सुरतेची लूट एवढेच चित्र गुजरातमध्ये रंगविले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी ते पुस्तक लिहिणार असून गेल्या सहा महिन्यांपासून विविध विषयांच्या पुस्तकांचा त्यांनी अभ्यासही सुरू केला आहे.’

मुख्यमंत्री म्हणाले की, भाजप हा व्यक्तीवर चालणारा पक्ष नसून या पक्षाला विचारधारा आहे. सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यिासाठी भाजप प्रयत्नशील असून सत्तेमध्ये नसतानाही आणि सत्तेमध्ये असतानाही या विचारधारेमध्ये कोणतीही तफावत झालेली नाही. लोकशाहीचा दावा करणारे पक्ष घराणेशाहीत अडकले आहेत. सोनिया गांधी यांना परिवाराची चिंता आहे, नरेंद्र मोदी यांना देशाची चिंता आहे. सामान्य नागरिकालाही सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी देणारा हा पक्ष आहे. गरिबांच्या कल्याणासाठी झटणारा हा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाच्या हिताचे घेतलेले निर्णय त्याची साक्ष देणारे आहेत. गॅस सबसिडी न घेण्याचे आवाहन, वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी), शौचालयांची उभारणी, उज्ज्वला योजना अशा अनेक योजना सामान्य माणसाच्या हितासाठी राबविण्यात आल्या आहेत.

 

Story img Loader