पुणे : ‘भारतातील समृद्धतेच्या आकर्षणातून आपल्या देशावर परकीयांची अनेक आक्रमणे झाली. या आक्रमकांनी लूट करून आपला देश उद्ध्वस्त केला होता. अशा उद्ध्वस्त भारताच्या संस्कृती, समाज आणि राष्ट्राचे रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. एका अर्थाने छत्रपती शिवराय हेच भारतीय संस्कृतीचे जीर्णोद्धारक आहेत,’ असे मत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने ३४५ व्या शिवपुण्यतिथीनिमित्त ‘भारतीय संस्कृतीचे जीर्णोद्धारक छत्रपती शिवराय’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी बलकवडे बोलत होते. भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सचिव सुधीर थोरात या वेळी उपस्थित होते.
बलकवडे म्हणाले, ‘हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक पातळ्यांवर क्रांतिकारी कार्य केले. शिवरायांनी कृषी क्रांती, सामाजिक क्रांती, अर्थ क्रांती, गनिमी-काव्याची युद्ध क्रांती, आरमार क्रांती, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग निर्मितीची क्रांती, भाषा-शुद्धी क्रांती आणि संस्कृतीच्या रक्षणाची सांस्कृतिक क्रांती करून एकप्रकारे भारतीय संस्कृतीचा जीर्णोद्धारच केला आहे. शिवरायांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादातून प्रेरणा घेऊन मराठ्यांनी औरंगजेबाशी यशस्वी संघर्ष करत आपल्या स्वराज्याचे रक्षण केले. याच राष्ट्रवादातून १८ व्या शतकात अटक ते कटकपर्यंत मराठा साम्राज्य निर्माण झाले. मराठ्यांनी फक्त साम्राज्यच निर्माण केले नाही तर प्रसंगी बलिदान देऊन राष्ट्राचेही रक्षण केले.’