पुणे : छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वाचेच आदर्श आहेत. सूर्य, चंद्राचे अस्तित्व असेपर्यंत शिवराय हे सर्वासाठी आदर्श राहतील, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. शिवरायांबाबत राज्यपालांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावाही फडणवीस यांनी केला.
शिवरायांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या अखिल भारतीय पोलीस रेसिलग क्लस्टर स्पर्धेच्या समारोपानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालांच्या विधानाबाबत फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले,‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, शौर्याची माहिती देशातील सर्वाना आहे. राज्यपालांनाही त्यांची माहिती आहे. त्यांच्या विधानाचा विपर्यास करून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र आणि देशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांव्यतिरिक्त दुसरा कोणताही आदर्श असू शकत नाही.’’
सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाबाबत फडणवीस म्हणाले की, ‘‘त्यांचे विधान मी नीट ऐकले आहे. महाराजांनी माफी मागितली, असे सुधांशू यांनी कुठेही म्हटलेले नाही.’’
‘पोलीस बदल्या नियमानुसारच’
पोलीस दलातील बदल्यांविषयी नाराजी असल्याबाबत विचारला असता, अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसारच केल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात राज्य पोलीस क्रीडा प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यापूर्वीच हा प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार होता. मात्र, करोना संसर्गमुळे या प्रस्तावाला काही प्रमाणात विलंब झाला. आता पुण्यात अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘राज्यपालांच्या विधानाचीपंतप्रधानांनी दखल घ्यावी’
मुंबई : राज्यात तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालांना शिवाजी महाराज आणि लोकभावना समजत नसेल, तर त्यांच्या पदाबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांच्या वक्तव्याची दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ आणि आदर्श राजे असून, राजसत्तेचा उपयोग त्यांनी लोककल्याणासाठी केला, याकडे लक्ष वेधत पवार यांनी राज्यपालांना सुबुद्धी लाभो, ही प्रार्थना, असे नमूद केले.
‘शिंदे गट सत्तेला चिकटून कसा?’
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने महाराजांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख करूनही शिंदे गट सत्तेला चिकटून कसा? आता कोणाला जोडे मारणार, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. शिवरायांबाबत राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा दुखावला गेला आहे, असे राऊत म्हणाले.