‘छत्रपती शिवाजी अध्यासना’चा दहा खंडांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवकाल आणि पेशवाई कालखंडातील व्यवहाराचे माध्यम असलेल्या मोडी लिपीतील कागदपत्रांतून मराठय़ांच्या इतिहासावर नवा प्रकाश पडणार आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी अध्यासनाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्यापैकी ‘मराठे-जंजिरेकर सिद्दी संघर्ष’ हा पहिला खंड ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी एकहाती सिद्ध केला आहे.

मराठय़ांच्या इतिहासाशी संबंधित माहितीचा समावेश असलेली मोडी लिपीतील सुमारे पाच कोटी कागदपत्रे पेशवे दफ्तरामध्ये आहेत. रियासतकार सरदेसाई यांनी ७५ वर्षांपूर्वी पेशवे दफ्तरातील कागदपत्रांचा अभ्यास केला होता. त्यानंतर पेशवे दफ्तरातील कागदपत्रे मोडी अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत, याकडे लक्ष वेधून पांडुरंग बलकवडे म्हणाले, मोडी लिपीतील कागदपत्रांचे लिप्यांतर करून गौरवशाली इतिहास प्रसिद्ध करण्याची आवश्यकता आहे. त्याचाच एक भाग म्हणून नव्या पिढीला मोडी लिपी शिकवून अभ्यास आणि संशोधनासाठी प्रवृत्त करण्याचा प्रकल्प श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने छत्रपती शिवाजी अध्यासनाच्या माध्यमातून हाती घेतला आहे. त्यापैकी ‘मराठे-जंजिरेकर सिद्दी संघर्ष’ हा पहिला खंड एकहाती सिद्ध केला आहे. मराठी सत्तेचा पानिपत, गुजरात, बुंदेलखंड, कर्नाटक, तमिळनाडू, माळवा अशा विविध प्रांतातील विस्तारावर स्वतंत्र खंड होतील. धार्मिक, राजकीय, सामाजिक विषयांबरोबरच शिवकाल आणि पेशवाई कालखंडापूर्वीच्या काळातील स्त्रियांची स्थिती यावर प्रकाश टाकणारी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत.

पूर्वीच्या काळात खरेदीखत, साठेखत आणि गहाणखत ही दैनंदिन व्यवहारातील कागदपत्रे मोडीमध्येच आहेत. मात्र, आता कोणालाच मोडी येत नसल्यामुळे भावी पिढय़ांना कागदपत्रे वाचता येत नाहीत. मोडी लिपी वाचून देणाऱ्यांना आर्थिक रोजगार उपलब्ध होत आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी मोडी लिपी शिकवीत असून आतापर्यंत दोन हजार जणांनी मोडी लिपी शिकली आहे, अशी माहिती बलकवडे यांनी दिली.

मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग 

संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वीच १९५७ पासून तत्कालीन मुंबई प्रांत सरकारने मोडी लिपी अभ्यासक्रमातून बाद करून टाकली. त्यामुळे मोडी लिपीचा मराठी भाषा आणि देवनागरी लिपीशी असलेला संबंध संपुष्टात आला. मोडी अस्तंगत होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे २ नोव्हेंबरपासून १७ डिसेंबपर्यंत प्रत्येक गुरुवार, शनिवार आणि रविवारी सायंकाळी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील वीर बाजी पासलकर स्मारक येथे होणाऱ्या या वर्गासाठी मोडी लिपीचे तज्ज्ञ संदीप तिखे आणि इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे मार्गदर्शन करणार आहेत.