मूल होत नसल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीला कोंबडीचे रक्त पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पत्नीने भोसरी पोलिसात तक्रार नोंदवली असून पती लैंगिकदृष्टया कमकुवत असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. दरम्यान, पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित आहेत अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अमित सुदाम वाघुले (३३) सुदाम श्रीपती वाघुले (६२) संध्या सुदाम वाघुले (५३) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती आणि सासरच्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल होण्यासाठी हा अघोरी प्रकार करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे भोसरी परिसरात उघड झाली आहे. आरोपी अमित वाघुले आणि तक्रारदार पत्नीचा विवाह २०१८ मध्ये झाला होता. दोघे ही उच्चशिक्षित असून काही दिवसांपूर्वी ते थायलंड येथे गेले होते. त्यानंतर, दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागला.

दरम्यान, मूल होत नसल्याने प्रवासादरम्यान एका निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून पतीने पत्नीला कोंबडीचे रक्त पाजले असे तक्रारीमध्ये म्हटलं आहे. तर, यापेक्षा आणखी धक्कादायक म्हणजे उपचारांसाठी पैसे घालविण्यापेक्षा मी तुला मूल देऊ शकतो अस सासऱ्यांनी म्हटल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पती लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याचं हे माहीत असताना देखील दोघांचे लग्न लावून देण्यात आले असाही आरोप तक्रारदार पत्नीने सासरच्या मंडळींविरोधात केला आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक जितेंद्र कडक हे करत आहेत.