दिवसा सातत्याने बसणारा उन्हाचा तडाखा आणि रात्री तुलनेने कमी राहणारे तापमान अशा विषम हवामानात विषाणूंच्या वाढीला चालना मिळाल्याचे चित्र आहे. डिसेंबरपासून सुरू झालेल्या कांजिण्या, गोवर, रुबेला आणि गालगुंडासारख्या विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या आता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
एप्रिलमध्ये आतापर्यंत केवळ दोनच दिवस कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या खाली गेले, इतर दिवशी ते ४० अंशांच्या जवळच राहिले. गुरुवारी सकाळी नोंदवलेल्या हवामानाच्या आकडय़ांनुसार पुण्यात दिवसाचे तापमान ३९.८ अंश होते, तर लोहगावला ४०.६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. कांजिण्या, गोवर, रुबेला आणि गालगुंड हे चारही आजार प्रामुख्याने उन्हाळ्यात पसरणारे असून सध्या त्यापैकी कांजिण्यांचा उपद्रव अधिक आहे. त्याखालोखाल गोवर व इतर दोन आजारही दिसत आहेत.
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ डॉ. भारत पुरंदरे म्हणाले, ‘सध्या कांजिण्यांचे प्रमाण मोठे आहे. सर्व वयोगटांमध्ये व काही गरोदर स्त्रियांमध्येही हे आजार बघायला मिळाले. या चार आजारांमध्ये ताप, अंगावर पुरळ उठणे ही लक्षणे दिसतात. ताप, अंगावर पुरळ, अंगदुखी, सांधेदुखी या लक्षणांमध्ये घरगुती उपाय म्हणून पॅरॅसिटॅमॉल घेतली तर चालू शकते, परंतु स्वत:च्या मनाने अॅस्पिरिनची गोळी घेऊ नये. त्यामुळे यकृताचा ‘रे सिंड्रोम’ हा दुर्धर काविळीचा आजार होऊ शकतो.’ ताप दोन दिवसांपेक्षा अधिक टिकला व घरगुती उपायांनी फरक पडत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच खूप तीव्र ताप, तापामुळे चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, असंबद्ध बरळणे, तापाच्या प्रभावामुळे रक्तदाब कमी होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवी वा नाकावाटे रक्तस्राव ही लक्षणे दिसल्यास मात्र त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
विषम वातावरणात एप्रिल व मे महिन्यात स्वाइन फ्लूची रुग्णसंख्याही काहीशी वाढत असल्याचे गेल्या ६ वर्षांपासून बघायला मिळाले असल्याचे असेही निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. सध्या शहरात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण असून त्यातील एका रुग्णास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
वेधशाळेने वर्तवलेल्या पुढच्या सहा दिवसांच्या हवामानाच्या अंदाजानुसार सर्व दिवस हवामान ढगाळ राहणार असून कमाल तापमान ३९ अंश वा त्याहून अधिकच राहील. शुक्रवार व शनिवारीही ४० अंश कमाल तापमानाचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा