पुणे : पुण्यात झालेल्या कोणत्याही गोष्टीची देशभर चर्चा होत असते. चर्चा झाली, तरी ‘हे फक्त पुण्यातच घडते’असे पुणेकर अभिमानाने छाती फुगवून सांगत असतात. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी भर पत्रकार परिषदेत राज्यात सर्वाधिक कमी मतदान हे पुणे आणि ठाण्यात होत असल्याची वास्तुस्थिती मांडली आणि मतदान करण्यात पुणेकर निरुत्साही असल्याचे उघड झाले. मात्र, ही काही फक्त गेल्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती नसून, आजवर प्रत्येक निवडणुकीत पुण्यात जेमतेम ५० टक्के मतदान झाले आहे. १८८३ पासून पुण्यात तत्कालीन नगर परिषदेपासून आजवरच्या मतदानाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास एखादी निवडणूक वगळता बहुतांश निवडणुकीत निम्मेच पुणेकर मतदान करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मतदानाला पुणेकर आळस का करतात, हा विषय चव्हाट्यावर आला आहे.

पुण्यात झालेल्या निवडणुका आणि त्या वेळी झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिल्यास मतदानाला आळस करणे, ही पुणेकरांची जुनी खोड असल्याचे दिसते. १८८३ पासून १९५२ पर्यंत झालेल्या तत्कालीन नगरपालिका निवडणुकांमध्ये काही अपवाद वगळता बहुतांश निवडणुकांमध्ये सरासरी ५० ते ५५ टक्के मतदान झाल्याचे दिसून येते. १८५० ते १८७२ या कालावधीत तत्कालीन नगरपालिकेचा कारभार हा सरकारनियुक्त सभासदांच्या ताब्यात होता. नगरपालिकेची पहिली निवडणूक ही २८ मार्च १८८३ रोजी झाली. त्या वेळी २४ पैकी १२ सभासद हे निर्वाचित होते. उर्वरित सरकारनियुक्त होते.

हे ही वाचा…बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात असमर्थता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुलनेने जास्त मतदान होत असते. वॉर्ड किंवा प्रभागाचे क्षेत्र मर्यादित असणे आणि उमेदवारांचा मतदारांशी असलेला रोजचा संपर्क यामुळे जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचा अंदाज काढला जातो. मात्र, आतापर्यंत झालेल्या निवडणुकीतील मतटक्का पाहिल्यास पुण्यात हा अंदाज फोल ठरलेला दिसतो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही पुणेकरांनी मतदानासाठी काही अपवादवगळता उत्साह दाखविलेला नाही.

पुणे नगरपालिकेची १९२२, १९२५ आणि १९३८ या वर्षी निवडणूक झाली होती. १९२२ मध्ये ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर १९२५ मध्ये ६७ टक्के, तर १९३८ मध्ये ६६ टक्के मतदारांनी मतदान केले होते. या तिन्ही निवडणुकांमध्ये मतदान वाढण्यास तत्कालीन परिस्थिती कारणीभूत होती. १९२२ आणि १९२५ मध्ये काँग्रेस, हिंदू सभा आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्यामध्ये चुरशीची स्थिती होती. त्याचा परिणाम मतदानावर झालेला दिसतो. १९३८ हे वर्ष मतदानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. त्या वेळी काँग्रेस पक्ष हा अधिकृतरीत्या निवडणुकीत उतरला होता. त्यामुळे काँग्रेसने त्या निवडणुकीत जोमाने प्रचारावर भर दिला. त्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढले होते.

पुणे महापालिकेची १९५० मध्ये स्थापना झाली. त्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतही ५० टक्केच मतदारांनी मतदान केले. त्या वेळी पुण्यात दोन लाख सहा हजार मतदार होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या संख्येत वाढ झाली, तरी मतदानाचा टक्का वाढलेला दिसत नाही.

हे ही वाचा…वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांना कोयत्याचा धाक, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही मतदानाबाबत पुणेकरांचा कल हा मतदान न करण्याकडे असल्याचे पाहायला मिळतो. लोकसभेच्या १९५१ ते आजपर्यंत झालेल्या १८ निवडणुकांमध्ये सरासरी ४५ ते ५० टक्के, तर विधानसभेला एखादी निवडणूक अपवादवगळता ५० ते ५५ टक्के मतदारांकडून मतदान झाले आहे. मतदानात आळस करण्याची पुणेकरांची जुनी सवय सर्वच निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का खालाविण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तरी मतदानाचा टक्का वाढावा, अशी प्रशासनाकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. sujit.tambade@expressindia. com