बारामती : ग्राहकांना अखंडित वीज सेवा देताना कर्मचाऱ्यांना दररोज जिवाची जोखीम पत्करुन वीज दुरुस्तीची कामे करावी लागतात. ही विजेची कामे करताना लाईनमन व लाईनवुमन्सनी सुरक्षा साधनांचा सातत्याने वापर करावा असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे. ऊर्जा भवन येथील सभागृहात आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय ‘लाईनमन दिवस’ कार्यक्रमात वीज कर्मचाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी बारामती ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता दिपक लहामगे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, म्हसू मिसाळ व संजय सोनवलकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुढे बोलताना मुख्य अभियंता पेठकर म्हणाले, महावितरणची आर्थिक परिस्थिती दोलायमान आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी महसूल वाढवून वीजचोरीला आळा घातला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रातील थकबाकीवर लक्ष केंद्रीत करुन ती वसूल करण्यासाठी टीम वर्कने काम करावे व दिलेल्या मुदतीत लक्ष गाठावे. तसेच काम करत असताना सुरक्षा साधनाचा व आर्थिंग रॉडचा वापर करुन स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता दिपक लहामगे यांनीही वीज कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन कोरडे यांनी वीज सुरक्षेबाबत सादरीकरण दिले. तर उपस्थित लाईनमन मधून हर्षद गावडे, राजेंद्र झिंझाडे व दामोदर कोकरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बारामती शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश जमाले, ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ यांचेसह विभागातील शाखा अभियंते व वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.