पिंपरी : ‘महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि सक्षम भविष्य निर्मितीकरीता समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करुया’असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन पुणे आणि अलीमा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे बुधवारी (१९ मार्च) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. कॅरोलीन मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी शकील शेख यावेळी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, ‘महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व महिला पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन महिला सुरक्षेसाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पोलीस प्रशासनास कायदेशीर मदतीची गरज लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण त्यांना नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर आहे. महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन करत असलेल्या कार्य चांगले आहे’.
यावेळी न्यायाधीश महाजन यांच्या हस्ते पोलीस दलातील ४१ महिला अधिकाऱ्यांना त्यांच्या सखी सुरक्षा आणि इतर उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि संकटातील महिलांचे संरक्षण करण्यासाठी ‘सखी सुरक्षा’ पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे, सर्व महिला अधिकाऱ्यांनी या संसाधनाचा प्रभावीपणे उपयोग करावा, असेही महाजन म्हणाले.
महिला सशक्तीकरणासाठी ‘सखी सुरक्षा’ पुस्तिका महत्त्वाची
‘सखी सुरक्षा’ पुस्तिका महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. संकटात असलेल्या महिलांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक तसेच तपास अधिकाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्जांचे क्युआर कोड या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. सर्वांनी या पुस्तिकेचा उपयोग करून महिलांच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी एकत्र यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.