पुणे : सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी समूह स्वयंपुनर्विकासाचा (क्लस्टर) लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी केली. राज्य सरकारने स्वयंपुनर्विकासाबाबत विविध अठरा निर्णय घेतले असून येत्या काही दिवसात आणखी काही निर्णय घेतले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘मुंबई शहरात स्वयंपुनर्विकासाचे प्रारूप यशस्वी होत आहे. स्वयंपुनर्विकास झालेल्या सोसायट्यांमधील घरांचा आकारही वाढला आहे. स्वयंपुनर्विकासाबाबत राज्य शासनाने अठरा निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गतच समूह स्वयंपुनर्विकासाचा निर्णय घेतला जाईल,’असे फडणवीस यांनी सांगितले.
ते म्हणाले की, राज्यातील सव्वा दोन लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहकारामध्ये स्थान नसल्याचे लक्षात आल्यानंतर २०२९ मध्ये कायद्यात बदल करण्यात आले. मात्र त्याचे नियम करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. येत्या दहा ते बारा दिवासत नियम जाहीर केले जातील. या नियमांच्या आधारे गृहनिर्माण संस्थांना कामकाज करता येणे शक्य होणार आहे. अपार्टमेंट कायद्यातही सुधारणा करण्यता आली असून अनेक तरतूदींचा समावेश करण्यात आला आहे. या तरतुदी करताना विकेंद्रीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवाली दिला असून पुढील एक महिन्यात अपार्टमेंट कायद्यात कालानुरूप बदल होतील. अपार्टमेंटच्या पुनर्विकासाच्या अडचणी दूर होतील.
दऱ्यान, सोसायट्यांच्या छतावर सोलर बसविण्यासाठी पंतप्रादन सूर्यघर मोफत वीजयोजना आहे. सोसायट्या सोलरयुक्त होण्यासाठी महासंघाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.