पिंपरी– चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे भूषवणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे शुकवारी (१८ एप्रिल ) रोजी सकाळी ९.४५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अरूण लाड, उमा खापरे, जयंत आसगावकर, योगेश टिळेकर, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, भीमराव तापकीर, विजय शिवतारे, महेश लांडगे, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनिल कांबळे, चेतन तुपे, शरद सोनवणे, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासणे, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके यांची उपस्थिती असणार आहे. तसेच क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

चिंचवड येथे उभारण्यात आलेले हुतात्मा चापेकर स्मारक क्रांतिकारक चापेकर बंधूंच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची आठवण करून देणारे स्थळ आहे. सन १८९७ मध्ये प्लेगच्या नियंत्रणासाठी नेमलेल्या ब्रिटीश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड यांचा वध केल्यामुळे हे बंधू ओळखले जातात. त्यांनी ब्रिटिशांच्या धोरणांचा विरोध केला आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. या स्मारकाच्या माध्यमातून क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या इतिहासाविषयी माहिती विविध स्वरूपात साकार करण्यात आली आहे. या स्मारकाचे लोकार्पण १८ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकासाठी  सुमारे १३ कोटी ५२ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. या स्मारकामध्ये ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा दोन मजली पारंपारिक लाकडी वाडा जतन करण्यात आला असून यात चापेकर बंधुंच्या कौटुंबिक जीवनाचे विविध चित्रण करण्यात आले आहे. आधुनिक एआर/व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून सजीव अनुभव देणाऱ्या घटनांचे चित्रण देखील करण्यात आले आहे.