आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात आहेत. कार्यक्रमाच्या तिसर्या दिवशी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हनुमान कथा सत्संग दरबार दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यांनी बागेश्वर धाम यांच्यापुढे नतमस्तक होत त्यांना लवून नमस्कार केला. त्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आल्याचे पाहण्यास मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले धीरेंद्र कृष्ण शास्त्री?
“आम्ही देवेंद्र फडणवीसांना यासाठी मानत नाही की ते मुख्यमंत्री आहेत किंवा कुठल्या पक्षाचे आहेत. आम्ही त्यांना मानतो कारण ते रामजींचे (प्रभू रामचंद्र) आहेत. जो रामका है वह हमारा है.. जो राम का नहीं वह किसी काम का नहीं. मुंबई आमचं घर आहे. तिथे ते राहतात.. मी त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. जय सिया -राम” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.
बागेश्वर बाबांविषयी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
बागेश्वर बाबा सनातन धर्माची सेवा करत आहेत. सनातन धर्मासाठी जनजागृती करत आहेत. जर भारताची जागृती झाली तर जगाची जागृती होईल. रामलल्ला जिथे विराजमान होते तिथेच प्रभू रामाचं मंदिर होतं आहे आणि २२ जानेवारीच्या दिवशी तिथेच रामलल्लाची प्रतिष्ठापना होते आहे.
बागेश्वर बाबा जेव्हा सनातन धर्माची गोष्ट करतात तेव्हा अनेक लोक त्यांना नावं ठेवतात. त्यांचा अपप्रचार करतात. सनातन म्हणजे जातीयवाद, परंपरावाद असं काहीजण म्हणतात. पण त्यांना सनातनचा अर्थच कळलेला नाही. सनातनचा अर्थ म्हणजे जे अनादी आणि अनंत आहे ते सनातन आहे. जो सगळ्यांना एकत्र बांधणारा विश्वास आहे, आपण सगले देवाची लेकरं आहोत या विचाराने सनातन धर्म पुढे जातो आहे. पुण्याचं भाग्य आहे की बागेश्ववर बाबा याठिकाणी आले. त्यांनी रामकथाही सांगितली. जो रामकथा ऐकतो त्याचं आयुष्य सार्थकी लागतं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. हे सगळं असलं तरीही बागेश्वर धाम यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला आहे ज्याची चर्चा होते आहे.