पिंपरी : चापेकर बंधू यांचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासातील अतुलनीय राहिले आहे. केवळ इंग्रज अधिकारी रँडचा वध केला एवढेच त्यांचे कार्य नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये प्रगतिशील विचार होते. तेही या क्रांतितीर्थ स्मारकात पहायला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहयोगाने आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने उभारलेल्या क्रांतिवीर चापेकर बंधू जीवन प्रसंग दृक्-श्राव्य संग्रहालयाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (१८ एप्रिल) झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘चापेकर बंधू यांचे शौर्य हे भारतीय क्रांतिकारकांच्या इतिहासातील अतुलनीय राहिले आहे. चापेकर बंधू यांचे स्मारक होणे महत्वाची गोष्ट आहे. स्मारक अतिशय सुंदर झाले आहे. त्यांच्या जीवनातील एक-एक प्रसंग जीवंत करणारे स्मारक तयार झाले. प्रत्येक शालेय विद्यार्थ्याने हे स्मारक पहावे. त्यातून खूप मोठी प्रेरणा मिळणार आहे. केवळ इंग्रज अधिकारी रँडचा वध केला एवढेच त्यांचे कार्य नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये प्रगतिशील विचार होते. तेही पहायला मिळणार आहेत. महिला, विधवा महिलांना पूजेचा अधिकार, सती प्रथेच्या विरुद्ध त्यांची काही मते होती. त्यावर त्यांनी काही कार्यवाही केली, या सर्व गोष्टी स्मारकात पहायला मिळतील. तंत्रज्ञानाचा अतिशय सुंदरपणे उपयोग केला आहे. त्यामुळे हे स्मारक प्रत्येकाने पाहिले पाहिजे’.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘क्रांतितीर्थ स्मारकाच्या कामाला विलंब झाला, हे मान्य आहे. आता राज्य शासनाने लक्ष घातले आहे. इतिहासाला साजेशे असे स्मारक होईल. राज्य सरकार, महापालिका आपला हिस्सा नियमितपणे देईल. राज्य सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या आतमध्ये स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे’.