पुणे : पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली. रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात गर्दी झाली होती. परिणामी, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक, खंडुजीबाबा चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन महाविद्यालय), डेक्कन परिसरात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. या रस्त्यांवर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या. या वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
हेही वाचा – एसटीचे अपघात रोखण्यासाठी नियमावली? परिणाम पडणार का?
u
दरम्यान, आपटे चौकात सांडपाण्याच्या भूमिगत वाहिन्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. तसेच सांडपाण्याच्या वाहिन्या आणि इतर साहित्य पदपथांवरच ठेवण्यात आले आले. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथावरील अडथळे ओलांडून मार्ग काढावा लागला. मुख्यमंत्र्यांचा दौरा असूनही वाहतुकीचे नियोजन नसल्याचा फटका वाहनचालक आणि पादचाऱ्यांना बसल्याचे दिसून आले.