महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मंगळवारी दिली. समाविष्ट गावांमध्ये अस्तित्वातील जलवाहिन्यांचे जाळे अपुरे असल्याने प्रतीदिन ५२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.
हेही वाचा >>>पुणे: संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासनाची तयारी;रुग्णालयांतील प्राणवायू, खाटा,पायाभूत सुविधांची तपासणी
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत समाविष्ट गावांतील पाणीटंचाईबरोबरच पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, विद्युत व्यवस्था, आरोग्य सेवक, कामगार भरतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीटंचाई असल्याची कबुली दिली. शिवणे, नऱ्हे, धायरी, उत्तमनगर आणि अन्य गावांमध्ये पाणीटंचाई आहे का, अशी विचारणा भीमराव तापकीर यांनी केली होती.
हेही वाचा >>>शैक्षणिक धोरणांतील अडचणी सोडवण्यासाठी सुकाणू समिती; अध्यक्षपदी डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती
समाविष्ट गावांमध्ये पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायती मार्फत घनकचरा व्यवस्थापन, विद्युत व्यवस्था आणि पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. समाविष्ट गावांमध्ये जलवाहिन्यांचे जाळे अपुरे आहे. त्यामुळे प्रतीदिन ५२५ पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या गावांमध्ये विद्युत व्यवस्था करण्यासाठी पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया राबवून विद्युत खांब उभारण्यात येईल. गावांमध्ये निर्माण होणारा चारशे मेट्रिक टन कचऱ्याची महापालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी ९५१ कंत्राटी सफाई आरोग्य सेवाकांची नेमणूक करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून सूस-म्हाळुंगे आणि बावधन बुद्रुक गावांचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. मलनिस्सारणाच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.