‘खासदार गिरीश बापट यांची सदिच्छा भेट घेतली. ते माझे जुने सहकारी आहेत. आम्ही विधानसभेत एकत्र काम केले आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गिरीश बापट यांच्या भेटीनंतर सांगितले. कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. कसबा भाजपच जिंकेल असे बापट यांनी सांगितल्याचे शिंदे म्हणाले.
हेही वाचा- “कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा भाजपा जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास
खासदार गिरीश बापट आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार आदींनी बापट यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. काही दिवसांपूर्वीच बापट यांना घरी सोडण्यात आले. तसेच कसबा पोटनिवडणुकीची रणधुमाळीही सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांची अचानक भेट घेतली.
बापट हे दिलखुलास आणि मनमोकळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे ते लवकरच बरे होतील आणि पुन्हा जनसेवेत रुजू होतील. त्यांचा दांडगा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ते आजारावर मात करतील, असेही शिंदे म्हणाले.
हेही वाचा- पुणे : मुख्यमंत्री-खासदार बैठकीचा विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गाला फटका
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा विषय न काढताही बापट यानी स्वतःहून या दोन्ही ठिकाणी भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल. बापट खासदार असले तरी कडवट कार्यकर्ता आहेत. त्यांचा प्रवास आणि मैत्री मी जवळून पाहिली आहे, असेही शिंदे म्हणाले.