मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत गणेशोत्सव काळात पुण्यात रात्री बारानंतरही लाऊड स्पीकरला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीनंतर शिंदेनी कानावर हात ठेवत हा सुप्रीम कोर्टाचा विषय असून त्यात काय मार्ग काढायचा, असा प्रतिप्रश्न शेटेंना विचारला आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
पुणे शहरातील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. पुण्याच्या गणपती मंडळाला ऐतिहासिक वारसा आहे. देशातील कानाकोपऱ्यातून अनेकजण गणेशोत्सव पाहायला पुण्यात येत असतात. मात्र, गणेशोत्सव काळात रात्री बाराच्या अगोदर लाऊडस्पीकर बंद करावा लागत असल्याने अनेक भक्तांचा हिरमोड होतो. गुजरात सरकारने गेल्या नवरात्रोत्सोवात रात्री १२ नंतरही लाऊडस्पीकर चालवण्याची परवानगी मंडळांना दिली होती. त्याच धर्तीवर पुण्यातही गणेशोत्सवकाळात रात्री १२ नंतरही लाऊडस्पीकर चालवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मात्र, शिंदेनी हा विषय सुप्रीम कोर्टाचा असल्याचे म्हणत याबाबत अधिक बोलणे टाळले.
हेही वाचा- मी मनसेतच! अजय शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे सांगितले कारण, म्हणाले…
पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश आणि चिरंजीव कुणाल यांची गुरूवारी केसरीवाड्यात भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत जवळपास वीस मिनिटे चर्चा करण्यात आली. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारल्याने ब्राह्मण समाजात नाराजी आहे. त्याच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे पारडे जड असल्याने भाजपा-सेना युतीपुढील अडचणीत वाढ झाली आहे.