लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्याचे वचन मी दिले आहे. नदी प्रदूषणमुक्तीसाठी नगरविकास विभागाने ८०० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे नदीसुधार योजनेचे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीत दिली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारीच्या तोंडावर नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग आला होता. त्यामुळे वारकरी, देवस्थानने नाराजी व्यक्त केली होती. याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करणे हे सरकारचे काम आहे. त्यासाठी पावले उचलली आहेत. नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी काम सुरू आहे. लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महेश लांडगेंनी केलं तुकोबांच्या रथाचं सारथ्य

‘बळीराजा सुखी होऊ दे’

मला या पालखी सोहळ्याला येण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरील सर्व संकटे, अनिष्ट दूर होऊ देत, महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदाचे दिवस येऊ दे अशी माउलीचरणी प्रार्थना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालखी प्रस्थानाला येणारे पहिलेच मुख्यमंत्री

मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कोणतेही मुख्यमंत्री पदावर असताना आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी आले नव्हते. आघाडी सरकार असताना राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असताना प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मात्र, मुख्यमंत्री आळंदीत प्रस्थान सोहळ्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.