पुणे : गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डाॅक्टरांना वाचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केला. याप्रकरणी रुग्णालय आणि डाॅ. धनंजय केळकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच रुग्णालयाचे विश्वस्त मंडळही बरखास्त झाले पाहिजे, अशी मागणी सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
‘सरकारला हे प्रकरण दडपायचे आहे,’ असा आरोप करून सपकाळ म्हणाले, ‘कारण नसताना ते चुकीची बाजू घेत आहेत. खऱ्याला खरे म्हणणे आणि चांगल्याला चांगले म्हणणे हा चांगुलपणा आहे. मात्र, या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केला आहे. मातृत्वासाठी आलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि या प्रकरणातील आरोपींना वाचवले जात आहे. मंगेशकर रुग्णालय हे लोकांच्या सेवेसाठी आहे. मात्र, ते रुग्णसेवेचा धंदा करत आहेत. त्या ठिकाणी सावकारी सुरू आहे. दरोडा घालून पैसे द्या, तरच उपचार करू, असे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितले जात आहे. या प्रकरणात पुरावा आपल्यासमोर आला आहे. आता अहवाल आला आहे. जोपर्यंत निर्दोषत्वाची ‘क्लीन चिट’ देणार नाही तोपर्यंत आम्ही तपासण्या आणि समित्या स्थापित करत राहू, असाच देवेंद्रजींच्या भूमिकेचा अर्थ आहे.’
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रुग्णालयाचे नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करावे, याकडे लक्ष वेधतानाच, ‘या प्रकरणात मंगेशकर परिवाराने गप्प राहण्याची घेतलेली भूमिका ही तितकीच कर्कश आहे,’ अशी टीका सपकाळ यांनी केली.