पिंपरी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पिंपरी-चिंचवड शहरातून माेठा प्रतिसाद मिळाला आहे. ४,३२,८९० महिलांनी अर्ज भरला. त्यांपैकी ३,८९,९२० महिला लाडक्या ठरल्या आहेत. त्यांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे. तर, ४२ हजार ४८६ महिलांचा अर्ज बाद झाला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसाहाय्य केले जाते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शहरातील रहाटणी येथील ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक ६५,८७१ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पांजरपोळ, भोसरी येथील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात ६३,१०६ आणि थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात ६०,०३३ महिलांचे अर्ज योग्य ठरले आहेत.
हेही वाचा…मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
तर, निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वाधिक १०,८२९ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील ७०६२ अर्ज बाद झाले आहेत. दरम्यान, आवश्यक कागदपत्रे नसणे, पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील, मर्यादेपेक्षा उत्पन्न अधिक, एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे, आदी कारणांनी हे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.