महाराष्ट्र सदनात घडलेला प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्राच्या थोर परंपरेला डाग लागेल, अशी ही घटना असल्याचा उल्लेखही चव्हाण यांनी यावेळी केला.
ते म्हणाले, महाराष्ट्र सदनात घडलेल्या प्रकाराबद्दल वस्तुस्थिती पूर्णपणे समोर आलेली नाही. तेथे जेवण पुरविण्यासाठी टेंडर काढण्यात आले, त्यावेळी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे आम्हीच रेल्वे मंत्रालयाला विनंती करून त्यांच्याकडून तिथे केटरिंगची सुविधा पुरविण्यास सुरुवात केली. तेथील जेवणाचा दर्जा चांगला नसल्याबद्दल याआधीही आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. मात्र, कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने आम्हाला आयआरसीटीसीकडेच हे काम ठेवावे लागले. संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २१ खासदारांना महाराष्ट्र सदनात उतरू देण्याची सूचना संसदीय कार्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र सदनाकडे आली होती. यामध्ये काही खासदार उत्तर प्रदेशातीलही होते. मात्र, त्यांना तिथे उतरू देण्याची सूचना संसदीय कार्य मंत्रालयाने केली होती. त्यात आमची काहीच भूमिका नव्हती. त्याचबरोबर महाराष्ट्र सदनात वेगवेगळ्या आकाराच्या खोल्या आहेत. त्यापैकी ज्या खोल्या उपलब्ध होत्या. त्या या २१ खासदारांना वाटून देण्यात आल्या. मग आम्हाला लहान खोली दिली, त्यांना मोठी खोली दिली, अशा कुरबुरी सुरू झाल्या. त्यातच केटरिंगची व्यवस्था पाहणाऱया कर्मचाऱयाला चपाती भरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची क्लिप तर सगळ्यांनीच पाहिली आहे. महाराष्ट्राच्या थोर परंपरेला डाग लागेल, अशीच ही घटना आहे. या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलीस करीत असून, लोकसभेचे पीठासीन अधिकारी दोषींबद्दल निर्णय घेतील.

Story img Loader