पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडील (पीएमआरडीए) ६५ मीटर रुंद वर्तुळाकार रस्त्याच्या एकूण १२८.०८ कि.मी. लांबीपैकी ४० कि.मी. लांबी विकसनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) हस्तांतर करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात दिली. पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि भूसंपादन प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.
विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पीएमआरडीएला आठ वर्षे पूर्ण झाली असूनही मेट्रो, वर्तुळाकार रस्ता, नगररचना योजना (टीपी स्कीम) यांसारखे प्रकल्प अद्याप पूर्ण झाले नाहीत हे अंशत: खरे आहे. पीएमआरडीएकडून कार्यान्वित सहा नगररचना योजनांचे काम सुरू आहे. तसेच माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे कामही प्रगतीपथावर असून सद्य:स्थितीत ३८.९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. म्हाळुंगे-माण नगररचना योजना क्रमांक एकसाठी १८ मे २०१८ रोजी प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाला ६१६.९० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. सन २०२३-२४ मध्ये नगररचना योजना क्रमांक एक ते सहासाठी २७५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पीएमारडीएच्या मंजूर आराखड्यानुसार प्रतिनियुक्तीने अनुभवी तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी उपलब्ध करून देण्यात येतात. विकासकामे अधिक गतीमान होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रकल्पांसाठी तज्ज्ञ, अनुभवी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जीआयएस आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.’