पुणे : राज्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. याच वेळी हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे.

राज्यात यंदा १ ते १६ जानेवारीदरम्यान चिकुनगुनियाचे १३० रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत चिकुनगुनियाचे ७७ रुग्ण आढळले होते. त्याच वेळी हिवतापाचे यंदा ४०१ रुग्ण आढळून आले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ही रुग्णसंख्या ५७२ होती. डेंग्यूची रुग्णसंख्या पहिल्या पंधरवड्यात २१० असून, गेल्या वर्षी ती ४२६ होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच वेळी डेंग्यूची रुग्णसंख्या कमी झाली आहे. कीटकजन्य आजारांमुळे यंदा राज्यात अद्यापपर्यंत एकही मृत्यू झालेला नसल्याचे आरोग्य विभागाच्या ताज्या अहवालातून समोर आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: शंभर रुपयांसाठी खून करणाऱ्याला सात वर्ष सक्तमजुरी

राज्यात पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले असून, बृहन्मुंबई महापालिका १९, सातारा जिल्हा १७, अकोला जिल्हा १५ अशी रुग्णसंख्या आहे. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदविण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदविण्यात आले असून, त्या खालोखाल अकोल्यात २३ रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाकडून उपाययोजना

कीटकजन्य आजाराचा रुग्ण आढळल्यास त्या परिसरामध्ये तापरुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून केले जात आहे. ताप रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करण्यात येत आहेत. याचबरोबर कीटकजन्य आजारांचा प्रसार झालेल्या परिसरात डासोत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट केली जात आहेत. तसेच, डासप्रतिबंधक औषधांची फवारणीही आरोग्य विभागाकडून सुरू आहे.

कीटकजन्य आजारांची रुग्णसंख्या

कालावधी – हिवताप – डेंग्यू – चिकुनगुनिया

१ ते १४ जानेवारी २०२४ – ५७२ – ४२६ – ७७ १ ते १४ जानेवारी २०२५ – ४०१ – २१० – १३०

Story img Loader