लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : आळंदीत बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या पतीसह बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आळंदी येथे वडगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात २१ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.
याबाबत मिलिंद सोपानराव वाघमारे (वय ४५, रा. परभणी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीचा पती, आई, मामा, मामी, सासू, सासरे यांच्यासह बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-महाराष्ट्र पूर्वपदावर आणण्यासाठी साहित्यिकांची लेखणी उपयुक्त; शरद पवार यांची अपेक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाघमारे हे परभणी येथील नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत. एका १७ वर्षे पाच महिने वयाच्या मुलीचा आळंदीत विवाह लावण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. आरोपींनी हा बालविवाह करण्यासाठी मदत केल्याची तक्रार वाघमारे यांनी केली. त्यानुसार बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार खडके अधिक तपास करीत आहेत.