पुणे : अवघ्या चौदा वर्षांच्या मुलीचा एका प्रौढ व्यक्तीशी होणारा विवाह बालकल्याण समितीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने रोखला. आळंदी परिसरातील एका मंगल कार्यालयात ही घटना घडली. वानवडी परिसरात राहणाऱ्या चौदा वर्षांच्या श्वेताच्या (नाव बदललेले आहे) आईचा मृत्यू ती लहान असताना झाला होता. तिच्या वडिलांना फिट येते. त्यामुळे वडील काही काम करत नाहीत. आजारपणामुळे वडिलांनी दुसरा विवाह केला नाही. मुलीचे संगाेपन करण्याची जबाबदारी वडिलांवर आली. भीक मागून त्यांनी उदरनिर्वाह केला. अखेर त्यांनी मुलीचा विवाह लावून द्यायचे ठरवले. विवाहाचा खर्च कोण करणार, हा प्रश्न वडिलांच्या समोर होता. त्यांनी चौदा वर्षाच्या मुलीपेक्षा मोठ्या असलेल्या एका व्यक्तीशी तिचा विवाह ठरवला. त्याला दोन मुले आहेत.
दोन दिवसांपूर्वी आळंदीतील एका कार्यालयात विवाह होणार होता. बालन्याय मंडळ समितीच्या माजी सदस्या मनीषा पगडे, लक्ष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पुंडे, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला यांना ही माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी बालन्याय मंडळ समितीच्याअध्यक्षा डॉ. राणी खेडीकर. सदस्य आनंद शिंदे, ॲड. पूर्वी जाधव, वैशाली गायकवाड, शामलता राव यांना दिली. त्यांनी वानवडी पोलिस ठाण्याला सूचना देऊन खातरजमा केली. मुलीचा जन्मदाखला तपासण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.. बालकल्याण समिती आणि पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यांनी हा बालविवाह रोखला आणि मुलीची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली.