लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने बालचमूंची पाऊले ‘पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगणकडे वळत आहेत. दीड महिन्यात ३८ हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. हसत-खेळत विज्ञान समजून घेता येत आहे. पालक आपल्या पाल्यांना विज्ञानयुगाची, आकाश गंगेची माहिती घडवत आहेत.
सुमारे सात एकर क्षेत्रफळावर सायन्स पार्कचा विस्तार आहे. फेब्रुवारी २०१३ पासून सायन्स पार्क प्रेक्षकांसाठी खुले झाले. तर, आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वीची माहिती घेण्यासाठी महापालिकेने १५ मे २०२३ पासून तारांगण प्रकल्प सुरु केला आहे. विज्ञानातील अनेक शोध, संदर्भ इमारतीमधील एकूण चार दालनांमध्ये प्रदर्शन स्वरूपात आहेत. तर, खुल्या उद्यानामध्ये विज्ञानाची तत्त्वे उलगडणारी खेळणी ठेवली आहेत. इमारतीमध्ये वाहनांची संपूर्ण माहिती देणारे ऑटोमोबाइल दालन, वातावरणीय बदलांची माहिती देणारे हवामान परिवर्तन दालन, मनोरंजक विज्ञान, ऊर्जा दालनासह ‘उडी सायन्स शो’ व तारामंडल शो सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी विज्ञानातील अनेक मूलभूत शोध त्यांच्या माहितीसह प्रतिकृती स्वरूपात पहावयास मिळतात.
आणखी वाचा-पिंपरीतील २४ अनधिकृत होर्डिंगधारक, मालकांविरुद्ध गुन्हे
सायन्सपार्कमध्ये डायनो पार्क, विज्ञान उद्यान लहान मुलांचे आकर्षण केंद्र आहे. ऑटोमोबाईल दालन, ऊर्जा दालन, हवामान परिवर्तन दालन हे नव्याने सुरु झाले आहे. या उद्यानातील भारतीय वैज्ञानिकांचे बसवण्यात आलेले अर्धाकृती पुतळे पाहून व त्यांच्या विषयीची माहिती वाचून लहान मुलांना प्रोत्साहन मिळते. याशिवाय आकाश दर्शन, विविध विज्ञान व्याख्याने, विज्ञान प्रात्यक्षिक कट्टा, उन्हाळी सुटीतील विज्ञान शिबिरे असे अनेक उपक्रम सातत्यपूर्वक या ठिकाणी चालू आहेत. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सायन्स पार्क, तारांगणला भेट देण्यासाठी येतात. शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने सायन्स पार्कची वेळ सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवली आहे. सोमवारी साप्ताहिक सुटीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात येत आहे. याचबरोबर उन्हाळी सुटीमध्ये खगोल विज्ञान, भौतिक, रसायन व जीवशास्त्र या विषयांवर मनोरंजक विज्ञान शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. विज्ञानाचा वारसा जपणाऱ्या या वारसास्थळाला पालक पाल्यासोबत आवर्जून भेट देत आहेत. बारा वर्षाखालील मुलांना ३० रुपये, त्यापुढील व्यक्तींना ६० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे.
घुमटाच्या दुरुस्तीसाठी तारांगण बंद
अंतराळ क्षेत्राची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांना या विषयात रस निर्माण होण्यासाठी महापालिकेने ११ कोटींचा खर्च करुन तारांगण प्रकल्प उभारला आहे. मात्र, ऐन उन्हाळी सुट्टीत देखभाल दुरुस्तीसाठी तारांगण प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून तारांगण बंद असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड होत आहे.
दीड महिन्यात ३८ हजार विद्यार्थ्यांची भेट
मागीलवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात सायन्स पार्कला ४७ हजार १८३ जणांनी तर तारांगणला ११ हजार ७९५ जणांनी भेट दिली होती. त्यालुनेत यंदा भेट प्रेक्षकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. एप्रिल ते २१ मे दरम्यान २३ हजार ४३६ जणांनी सायन्स पार्क तर १५ हजार ५५ जणांनी तारांगणला अशा ३८ हजार ४९१ जणांनी भेट दिली आहे.
उन्हाळी सुट्टीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सायन्स पार्क, तारांगणला भेट देत आहेत. सायंकाळी सात वाजेपर्यंत सायन्स पार्क सुरु ठेवले जाते. तारांगण प्रकल्प दुरुस्तीसाठी बंद असून लवकरच खुला केला जाईल. -सुनील पोटे, सहायक शिक्षण अधिकारी, सायन्स पार्क