पुणे : लहान मुलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ही मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत मे महिन्यात रेल्वे सुरक्षा दलाने १६३ मुलांना शोधून त्यांना कुटुंबीयांच्या हवाली केले. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. याचबरोबर दलाकडून ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची मोहीम राबविली जात आहे.
या मोहिमेत मध्य रेल्वेत १६३ मुलांची सुटका करण्यात आली. त्यात १३३ मुले आणि ३० मुलींचा समावेश आहे. त्यांना चाइल्डलाइन स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा जोडण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात सर्वाधिक ७८ मुलांची (७० मुलगे व ८ मुली) सुटका करण्यात आली. मुंबई विभागात ३४ (२३ मुलगे व ११ मुली), नागपूर विभागात १४ (५ मुलगे व ९ मुली), सोलापूर विभागात ४ (२ मुलगे व २ मुली) आणि पुणे विभागात ३३ मुलग्यांची सुटका करण्यात आली.
अशी होते सुटका…
घरगुती भांडणामुळे अथवा कौटुंबिक समस्यांमुळे अनेक मुले घर सोडून पळून येतात. याचबरोबर चांगले जीवन आणि शहरातील झगमगीत आयुष्याचे आकर्षण यामुळे कुटुंबीयांना न सांगता मुले घर सोडतात. रेल्वे स्थानकावर येणारी अशी मुले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान शोधून काढतात. हे जवान त्या मुलांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांसह पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतात.