सासवड : येथे दोन लहान चिमुकले विद्यार्थी घराबाहेर खेळत असताना त्यांना एक पिवळी धमक चकाकणारी गोल माळ दिसली. त्यांनी ती माळ घरी आणून पालकांकडे दिली व खेळताना सापडल्याचे सांगितले . मात्र ही माळ पाहताच पालकांना धक्काच बसला .कारण ती माळ नकली नव्हती तर चक्क सोन्याची होती . मोहनमाळ हा सोन्याचा दागिना होता . याची किंमत तब्बल साडेचार लाखाच्या पुढे होती. या पालकांनी प्रामाणिकपणे ही माळ सासवड पोलीस ठाण्यात आणून जमा केली.सासवड पोलिसांनी खात्री पटवून मूळ मालकाला हा दागिना परत केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सासवड परिसरातील प्राचीन कुंजीरवाड्याजवळ सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ सोनू काका जगताप यांचे घर आहे. सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांच्या घरातील वरुण प्रदीप जगताप (वय ९) व शर्व राज महेंद्र जगताप (वय ८) ही दोन चिमुकली मुले दुपारी घराबाहेर खेळत होती. खेळताना या मुलांना पिवळी चकाकणारी माळ सापडली. कुतूहलाने त्यांनी ती माळ घेऊन घर गाठले .घरात आल्यावर त्यांनी सोनू काकांना आम्हाला ही माळ सापडल्याचे सांगितले.यावेळी ही माळ नक्कीच सोन्याची असेल असे त्यांना वाटले , खात्री करून त्यांनी त्वरित दोन्ही मुलांना घेऊन सासवड पोलीस स्टेशन गाठले . सोन्याची मोहन माळ पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केली.

सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी आपण हा सोन्याचा दागिना सापडल्याचे सर्वत्र प्रसारित करून मालकाचा शोध घेऊ असे सांगितले. मात्र तोपर्यंत मेघा रमेश गायकवाड (रा. कात्रज पुणे )या कुंजीरवाड्याजवळच्या रस्त्यावर दागिना शोधण्यासाठी हिंडताना त्यांच्या कुटुंबीयांना दिसल्या ,त्यांना सासवड पोलीस ठाण्यात दागिना जमा केल्याची माहिती मिळाली, पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी बिलाचा फोटो व सर्व खात्री केल्यावर सोन्याची मोहन माळ मेघा गायकवाड यांना परत दिली.

सासवडच्या कऱ्हा नदीच्या परिसरामध्ये प्राचीन संगमेश्वराचे मंदिर आहे .या ठिकाणी अनेक लग्न ठरलेले वधु वर प्री-वेडिंग शूटिंग करण्यासाठी येतात. मेघा गायकवाड याही येथे आल्या होत्या. प्री-वेडिंग झाल्यावर हा दागिना त्यांच्याकडून खाली पडला होता . तो चिमुकल्यांना सापडल्याने परत मिळाला. याचे वजन ५२ ग्रॅम आहे. सुमारे साडेचार लाख रुपये किमतीची हरवलेली मोहन माळ परत मिळाल्यानंतर मेघा गायकवाड यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना. लग्नासाठी ही सोन्याची मोहन माळ खरेदी केली आहे ,ती परत मिळाल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला असे म्हणत त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. पोलीस खात्याचे आभार मानले. समाजामध्ये सोनू काकांसारखी निस्वार्थी वृत्ती ,प्रामाणिकपणा जपणारी माणसे आहेत. याचा अनुभव आल्याचे सांगितले.

चिमुकले विद्यार्थी व जगताप परिवाराचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद

चिमुकले विद्यार्थी वरुण व शर्वराज ,सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक जितेंद्र उर्फ सोनू काका जगताप यांनी जागरूक राहून सोन्याचा दागिना सासवड पोलीस ठाण्यात आणून जमा केला. त्यांचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे. त्यांच्या कर्तव्य तत्परतेमुळे मूळ मालकाला दागिना परत मिळाला .अशा पद्धतीने सर्व समाजाने जागरूक राहून कार्य केले पाहिजे. दक्ष राहिले पाहिजे असे सांगून पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांनी पोलीस खात्यातर्फे तिघांचा सत्कार केला.