— सागर कासार
भीक मागणे, चोऱ्या करणे, दारु काढणे अशा अनेक वाईट कामांपासून मुलांना दूर करीत त्यांना सन्मार्गाचा आणि शिक्षणाचा मार्ग दाखवत मुख्य प्रवाहात आणण्याचे काम एक सामाजिक संघटना करीत आहे. या संघटनेच्या वसतिगृहातील मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नुकतीच पुण्यातल्या मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी आपले मोठेपणी डॉक्टर, इंजिनिअर तसेच सीआयडी ऑफिसर होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
वर्धा येथील संकल्प वसतिगृहाच्या माध्यमातून समाजापासून तुटलेल्या मुलांच्या संगोपनाचे काम केले जात आहे. या मुलांमध्ये पारधी आणि भटक्या समाजातील मुलांचा समावेश आहे. पूर्वी गावामध्ये चोरी किंवा दरोड्याची घटना घडली की पारधी आणि भटक्या समाजाला लक्ष्य केले जात होते. त्यामुळे हा समाज गावकुसाबाहेर आणि कायम भटकतच राहिला. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वर्ध्यातील रोठा येथील संकल्प वसतीगृहाच्या प्रमुख मंगेशी मून करीत आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडाळाची चांगल्या पगाराची नोकरी सोडून या मुलांसाठी मंगेशी मून काम करीत आहेत. मंगेशी वर्ध्यात आपल्या वडिलोपार्जीत अकरा एकर जागेपैकी दोन एकर जागेत वसतीगृह चालवितात. सध्या त्यांच्या वसतीगृहात पारधी आणि भटक्या समाजातील एकूण ५० विद्यार्थी आहेत. या मुलांना पहिल्यांदाच पुण्यात सुट्टीनिमित्त आणण्यात आले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्यावर बेतलेले भयानक प्रसंग समोर आले.
एका नववीत शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांने सांगितले की, त्याला त्याची आई भीक मागयाला लावत असत. कोणी भीक दिली नाही तर त्याला खूप मार खायला लागायचा. त्यामुळे मग त्याने चोरी करून आईला पैसे द्यायचे ठरविले आणि त्यासाठी त्याने तब्बल २० सायकली चोरल्या आणि त्यातून आलेले पैसे आईला दिले. आता पुढे काय करायचे असा विचार करीत असताना मोठ्या भावाने दारू विकायचा व्यवसाय सुरु केला आणि त्याने मला देखील त्याच्या दुकानावर बसवले. त्यामुळे मला देखील दारूचे व्यसने लागले आणि त्याच दरम्यान आईचे निधन झाले. आता सगळं संपलं असं वाटत असताना मुंबईत रेल्वे फ्लटफॉर्मवर भीक मागत असताना मंगेशी ताईंनी माझी विचारपूस केली. माझी हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या वस्तीगृहात आणले. आता इथे मी नववीच्या वर्गात शिक्षण घेत असून मोठा झाल्यावर इंजिनीअर व्हायचे आहे.
दुसरा विद्यार्थी म्हणाला, मला आणि बहिणीला माझी आई भीक मागण्यासाठी पाठवयाची. भीक नाही मिळाली तर दोघांना बेदम मारायची पण जेव्हा आम्हाला पैसे मिळायची त्यातून ती दारू प्यायची. हे पाहून खूप वाईट वाटायचे पण आम्ही हतबल होतो काहीही करु शकत नव्हतो. दरम्यान, एकदा आम्हाला रेल्वे प्लॅटफॉर्मवर मंगेशी ताई भेटल्या आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या संस्थेत आणले. आता त्या आम्हाला शिक्षण देत आहेत. पुढे खूप शिकून मला सीआयडी ऑफिसर व्हायचंय अस त्यानं यावेळी सांगितलं.
एक विद्यार्थीनी म्हणाली, मला जस आठवतं त्यानुसार घरामध्ये मी सतत भांडणं पाहिली. त्यानंतर जसे समजायला लागले तसे आईने मला दारूची भट्टी काढायला शिकवले. त्या घाणेरड्या वासाने नको नको व्हायचं पण आईच्या भीतीपोटी सर्व कारावं लागत होतं. मात्र, आता संकल्प वस्तीगृहात आल्यापासून जीवनच बदलून गेले आहे. मी सहावीत शिक्षण घेत असून अनेक स्वप्नं पाहिली आहेत. पुढे जाऊन मला डॉक्टर व्हायचे आहे.
संकल्प वस्तीगृहाच्या संस्थापिका मंगेशी मून म्हणाल्या, वर्धा येथे उच्च शिक्षण घेतल्यावर मुंबईमध्ये महिला आर्थिक विकास महामंडाळ मध्ये नोकरी करीत असताना प्रवासादरम्यान भीक मागणारी, काहीतरी वस्तू विकणारी मुलं दिसायची. त्यांच्याशी अनेकदा संवाद झाल्यानंतर या मुलांसाठी आपण काम करायचे असा विचार मनात आला आणि त्यासाठी वसतीगृह स्थापण्याचे मी ठरविले. याबाबत माझ्या कुटुंबियांशी बोललल्यानंतर माझ्या वडिलांनी या कामासाठी अकरा एकर जागा दिली. मात्र, ज्यावेळी प्रत्यक्ष या मुलांना वसतीगृहात न्यायची वेळ आली त्यावेळी त्यांच्या पालकांना आम्हाला खूपच समजावून सांगावे लागले. आज आमच्या संस्थेत ५० विद्यार्थी असून त्यांची सर्व काळजी घेतली जात आहे. या कामात आई, दोन भाऊ आणि सहा जण मला मदत करीत आहेत. समाजातील इतरही वंचित मुलांसाठी लोकांनी पुढे यावे आणि मदतकार्य करावे असे आवाहन यावेळी मंगेशी मून यांनी केले.