पिंपरी : महापालिका हद्दीतील कचरा वेचकांंच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पहिली ते सातवीमध्ये शिकत असलेल्या मुलांना चार हजार रुपये, तर आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.महापालिकेच्या हद्दीत राहत असलेले व कचरावेचकांचे काम करणाऱ्यांंच्या मुलांचे जीवनमान उंचाविणे. त्यांचे सक्षमीकरण करणे, पैशांअभावी शिक्षणात खंड पडू नये यासाठी शैक्षणिक अर्थसहाय्याची योजना सुरू करण्यात आली आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी या योजनेला मान्यता दिली.
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यासाठीच्या अर्जासोबत महापालिका हद्दीतील आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, विद्यार्थ्यांची मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची प्रत, सध्याच्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतल्याचे बोनाफाइड प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकची प्रत जोडणे आवश्यक आहे. कचरावेचक पालक नोंदणीकृत कचरावेचक संघटनेचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र देखील सोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच आठवी ते दहावीमध्ये ५० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या कचरावेचकांच्या मुलांसाठी सायकल घेण्यासाठी सात हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.