बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषणाची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शाळास्तरावरील समित्या, सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांची चर्चा नव्याने सुरू झाली. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत समित्या स्थापन करण्याचे, सीसीटीव्ही बसवण्याचे पुन्हा एकदा आदेश दिले. मुलांना आपल्या पालकांशिवाय अगदी मोकळेपणाने शिक्षकांकडे व्यक्त होता येतं किंवा शिक्षकांना मुलांमधील बदल टिपता येत असतात. त्यामुळे मुलांना मोकळेपणाने बोलता येईल, मनातला कोलाहल व्यक्त करता येईल, इतकं मोकळं, सुरक्षित नातं शिक्षक-मुलांमध्ये, शाळेत निर्माण होणं ही काळाची गरज आहे.

शाळास्तरावर विविध प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. त्यात शाळा समिती, समन्वय समिती, विद्या समिती, शाळा व्यवस्थापन आणि विकास समिती, शिक्षक पालक संघ, शालेय परिवहन समिती, पोषण आहार समिती, माता पालक संघ, महिला तक्रार निवारण समिती, विशाखा समिती, मीना राजू समिती, सखी सावित्री समिती अशा समित्यांचा त्यात समावेश आहे. या प्रत्येक समितीची कार्यकक्षा, कार्यपद्धती, उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. त्यातही शिक्षक-पालक संघ, शालेय परिवहन समिती, पोषण आहार समिती, माता पालक संघ, महिला तक्रार निवारण समिती, विशाखा समिती, मीना राजू समिती, सखी सावित्री समिती या समित्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत. बदलापूरसारखी एखादी घटना घडल्यावर या समित्यांविषयी पुन्हा चर्चा होऊ लागते. समितीमध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी अशा विषयांवर चर्चा करून उपाय करणे महत्त्वाचे आहेच, पण त्याही पलीकडे गरज आहे ती मुलांना विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करण्याची, मुलांना विश्वासात घेण्याची. त्यात पालक, शाळा, शिक्षक या सर्वच घटकांची भूमिका महत्त्वाची आहे.

हेही वाचा : पुणे : महापालिकेने दिल्या २२९ मूर्ती विक्रेत्यांना नोटीस, काय आहे कारण ?

आजच्या मुलांचं भावविश्व प्रचंड वेगळं आहे. भवताल सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या व्यामिश्र झाला आहे. त्याचे परिणाम मुलांच्या मनावर होत असतात, त्याविषयी त्यांना प्रश्न पडत असतात. मुलांच्या हाती स्मार्ट फोन, इंटरनेटसारखं तंत्रज्ञान आहे, लहान वयापासूनच त्यांना स्पर्धेला तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांचा स्मार्ट फोन, इंटरनेटचा वापर हाही गांभीर्याने चर्चा करण्याचा विषय आहे. कारण मुले या माध्यमातून काय पाहतात, काय विचार करतात, त्यांच्या पाहण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो याकडे लक्ष देणं महत्त्वाचे आहे. अनेकदा नोकरदार पालकांना मुलांसाठी वेळ देणं शक्य होत नाही. कला, क्रीडा, अभ्यासासाठीच्या वेगवेगळ्या शिकवणी वर्गांमध्ये मुलांना गुंतवून ठेवलं जातं. मुलांचं वेळापत्रकच धावपळीचं असल्यावर मुलांशी संवादच होत नाही. पण, पालकांनी मुलांसाठी वेळ काढायलाच हवा. त्याला पर्याय असूच शकत नाही.

घरानंतर मुलं सर्वाधिक वेळ शाळेत असतात. त्यामुळे शिक्षकांना प्रत्येक मूल माहीत असणं, त्याच्यातले गुण-दोष माहीत असणं अपेक्षित आहे. शिक्षकांनाही शिकवण्याव्यतिरिक्त वेगवेगळी शालेय, प्रशासकीय कामं करावी लागत असली, तरी मुलं हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे आजची परिस्थिती लक्षात घेता वर्गातल्या मुलांकडे, त्यांच्या वागणुकीत होणाऱ्या बदलांकडे शिक्षकांचं लक्ष असायला हवं. त्यासाठी अभ्यासापलीकडे मुलांशी सुसंवाद असायला हवा. मुलांना स्वतःहून त्यांना काय वाटतं ते बोलावंसं वाटलं पाहिजे, इतकं खुलं पारदर्शक वातावरण वर्गात, शाळेत असायला हवं. जेणेकरून मुलांच्या मनात काही गैरसमज असतील तर ते दूर करता येतील. काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं देता येतील. काही अडचण, त्रास जाणवत असेल तर त्यावर उपाय करता येईल. बदलता काळ लक्षात घेऊन मुलांना अभ्यास, ‘गुड टच बॅड टच’च्या पलीकडे कायद्यांची जुजबी माहिती, स्वसंरक्षणाचं महत्त्व समजावणं गरजेचं आहे.

हेही वाचा : पुणे : पालिकेने नऊ दिवसांत बुजविले ४९९ खड्डे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची मलमपट्टी

शाळांमध्ये समित्या असणं, त्यांनी त्यांचं काम करणं हा प्रशासकीय भाग झाला. समित्या कागदावर न राहता गांभीर्यानं कामकाज करणं, त्यात विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करणं गरजेचंच आहे. पण, सर्वाधिक महत्त्वाचं आहे ते पालक-मूल, शिक्षक-विद्यार्थी हे नातं विकसित होणं, बहरणं… त्यासाठी समित्यांपलीकडे पालक-मूल, पालक-शिक्षक, शिक्षक-विद्यार्थी हा सुसंवाद असण्याचीच नितांत गरज आहे. त्यासाठी आधी मुलांना गांभीर्यानं घ्यावं लागेल, त्यांचं म्हणणं समजून घेण्याला प्राधान्य द्यावं लागेल.
chinmay.patankar@expressindia.com