बालनाटय़ संमेलनाच्या माध्यमातून बालरंगभूमी चळवळीचे संवर्धन होणार आहे. त्यामुळे बालनाटय़ चळवळीचे रूपांतर वटवृक्षात होईल, अशी आशा नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांनी रविवारी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे आयोजित बालनाटय़ संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात काकडे बोलत होते. अभिनेता सुबोध भावे, कवी संदीप खरे, अभिनेत्री ऋतुजा देशमुख, बालकलाकार तेजश्री वालावलकर, कलागौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय छाजेड, नाटय़ संस्कार कला अकादमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी, नगरसेवक राहुल तुपेरे, शाखाध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष दादा पासलकर, अविनाश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे, शुभांगी दामले आणि मकरंद टिल्लू या वेळी उपस्थित होते.
कुंडीतील रोपाला जल अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. हा संदर्भ देत अरुण काकडे यांनी ही आशा व्यक्त केली. बालनाटय़ संमेलन हे त्या दृष्टीने या रोपाला आलेले पहिले पान आहे. भविष्यात या पानांचे वृक्षामध्ये रूपांतर होईल, अशी अपेक्षा काकडे यांनी बोलून दाखविली.
नाटकात काम करतो अशी फुशारकी मारण्याची बालकलाकारांची इच्छा असते. खरे तर ते नाटक कळण्याचे वय नसते. पण, अभिनयाची संधी मिळाली नाही तेव्हा प्रकाशयोजना, नेपथ्य, पाश्र्वसंगीत अशी विविध तांत्रिक अंगे करून पाहिली. रंगमंचावरचे आणि पडद्यामागचे कलाकार असे सगळे भेदभाव विसरायला लावणारी नाटक ही सांघिक कृती असल्याचे सुबोध भावे याने सांगितले.
नाटकातून आनंद मिळतो. नाटकातील भूमिकेने मजा करायला मिळते. तसेच खूप काही शिकायलाही मिळते. त्यामुळे हे संमेलन संपल्यानंतर गावी गेल्यावर देखील बालनाटय़ करीत राहा, असे ऋतुजा देशमुख हिने आपल्या मनोगतातून सांगितले.
आपण जे कोणी नाही ते होऊ पाहण्याची गंमत केवळ नाटकातूनच अनुभवता येते. हा अनुभव आयुष्यभर पुरणारा आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात हस्तकला, चित्रकला याप्रमाणेच नाटय़कला हा अभ्यासक्रम असला पाहिजे, असे मत संदीप खरे याने व्यक्त केले. बालकविता लिहिणाऱ्या संदीपने बालनाटय़ लेखन करण्याचा मानसही बोलून दाखविला. सुरेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक रेगे यांनी आभार मानले.