यंदाच्या सुटीत केवळ १५ दिवसच प्रयोग; मुलांना नाटकासाठी पाठवण्यास पालक तयार नाहीत
कडक उन्हाच्या झळा यंदा बालरंगभूमीला बसल्या असून बालनाटय़ाचे प्रयोगही कमी झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती असलेले भरत नाटय़ मंदिर दुरुस्तीच्या कामानंतर १४ मेपासून बालनाटय़ांसाठी खुले होत असल्याने यंदाच्या सुटीत बालनाटय़ांचा हंगाम केवळ १५ दिवसांपुरताच मर्यादित झाला आहे. अन्य नाटय़गृहांमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच प्रयोग झाले असून त्यालाही थंडा प्रतिसाद मिळाला. कडक उन्हामुळे पालक मुलांना पाठवायला तयार नसल्याने बालनाटय़ांचे प्रयोग कमी झाले असल्याचे दिसून येते.
उन्हाळ्याची सुटी आणि बालनाटय़ असे पुण्यातील बालचमूंचे समीकरण असते. शहराच्या मध्यवर्ती असलेले भरत नाटय़ मंदिर हे बालनाटय़ांचे माहेरघर मानले जाते. आजी-आजोबांबरोबर बालनाटय़ पाहण्यास येणारे बाळगोपाळ हे दृश्य अनेक वर्षे या नाटय़गृहाने अनुभवले आहे. दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे यंदा भरत नाटय़ मंदिर गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. हे नाटय़गृह आता गुरुवारपासून (५ मे) सुरू होत आहे. मात्र भरत नाटय़ मंदिराचा वासंतिक नाटय़महोत्सव झाल्यानंतर १४ मेपासून हे नाटय़गृह बालनाटय़ांसाठी खुले होईल. तेथे ३१ मेपर्यंत विविध संस्थांचे बालनाटय़ांचे प्रयोग होणार आहेत, असे या नाटय़गृहाचे व्यवस्थापक विश्वास पांगारकर यांनी सांगितले. एक जूनपासून मुलांना आणि पालकांना शालेय साहित्य खरेदीचे वेध लागतात. त्यामुळे यंदाच्या सुटीत केवळ १५ दिवसच बालनाटय़ांचा आनंद लुटता येणार आहे.
‘जादूचा शंख’, ‘हिमगौरी आणि सात बुटके’, ‘अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा’, ‘अलबत्या गलबत्या’ या बालनाटय़ांची मोहिनी अजूनही मुलांवर आहे. गेली अनेक वर्षे ही नाटके होत असली तरी मुले नाटक पाहण्याची संधी सोडत नाहीत. रांग लावून पालक तिकीट काढतात आणि मुलांना घेऊन नाटक पाहतात. ‘‘यंदा कडक उन्हामुळे पालक मुलांना नाटक पाहण्यास पाठविण्यास राजी नाहीत. त्यामुळे उपनगरातील नाटय़गृहांमध्ये प्रयोग केले असले तरी थंडा प्रतिसाद लाभला. परिणामी आर्थिक नुकसानच सोसावे लागले,’’ असे नाटय़संस्कार कला अकादमीचे प्रकाश पारखी यांनी सांगितले. भरत नाटय़ मंदिर बंद असल्याचा फटका बसला. मोठी नाटय़गृहे एक तर उपलब्ध होत नाहीत आणि तारीख मिळालीच तर ती कधी काढून घेतली जाईल हे सांगता येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहामध्ये बालनाटय़ाचे चार प्रयोग झाले. मात्र, बाळगोपाळांची संख्या मर्यादित होती. पद्मावती येथे अण्णा भाऊ साठे नाटय़गृह झाल्यामुळे यंदा मुक्तांगण बालरंजन केंद्रामध्येही बालनाटय़ाचे प्रयोग झालेले नाहीत. एकीकडे कडक उन्हाचा तडाखा आणि मुलांच्या अन्य छंद वर्गाचा फटका बालनाटय़ांना बसला, असे नाटय़व्यवस्थापक सत्यजित धांडेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा उद्यापासून बालरंगमहोत्सव
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून मे महिन्याच्या सुटीमध्ये मुलांच्या सकस मनोरंजनासाठी गुरुवारपासून (५ मे) ग्रिप्स नाटय़चळवळीतील नाटकांचा बालरंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे १६ मेपर्यंत दररोज सायंकाळी सहा वाजता हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात ‘एकदा काय झालं’, ‘गोष्ट सिम्पल पिल्लाची’, ‘छान छोटे वाईट मोठे’, ‘तू दोस्त माह्य़ा’, ‘प्रोजेक्ट अदिती’ ही ग्रिप्स चळवळीतील नाटके सादर होणार आहेत. संस्थेने लहान मुलांना घेऊन बसविलेला ‘अंगत-पंगत गाणी’, बेळगावच्या बालकलाकारांचे ‘संगीत सौभद्र’ तसेच पुण्यातील बालनाटय़संस्थांच्या ‘कौन बनेगा कचरापती’, ‘कोवळे दिवस’ या कलाकृतींचा
समावेश आहे. राक्षस, जादूटोणा, भुतंखेतं याच्यातून बाहेर पडून सकस जीवनदर्शी पर्याय मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांना देणे हे या नाटकांचे वैशिष्टय़ आहे, अशी माहिती शुभांगी दामले यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा