पिंपरी : चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखाेरी झाली आहे. चिंचवडमधून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक नाना काटे, भाऊसाहेब भाेईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर पिंपरीतून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (रिपाइं) माजी नगरसेविका चंद्रकांता साेनकांबळे, भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखाेरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुतीपुढे बंडखाेरी शमविण्याचे आव्हान असणार आहे.

‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला उमेदवारी’ या सूत्रानुसार, चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपला, तर पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मिळाला आहे. मागणी करूनही चिंचवड विधानसभेची जागा पदरात न पडल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपचे काम न करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक असलेले माजी नगरसेवक नाना काटे आणि भाऊसाहेब भाेईर यांनीही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या दोघांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश येते का पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>दिवाळीतील हवा अन् ध्वनिप्रदूषणावर नजर! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष

यापैकी काटे यांनी आपण निवडणूक लढविणारच असून, महायुतीचे शंकर जगताप आणि महाविकास आघाडीचे राहुल कलाटे यांचे आव्हान नसल्याचे म्हटले आहे. तर, काटे हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. त्यामुळे ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले मोबाइल संच नागरिकांना परत

भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे

चिंचवड भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर झाली आहे. शंकर जगताप यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, संदीप कस्पटे, शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले आहे. जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तिघेही उपस्थित होते. शत्रुघ्न काटे यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.