Chinchwad Vote Counting Updates: गेल्या महिन्याभरापासून पुण्यातल्या दोन निवडणुका या राज्यभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले होते. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपाने उमेदवारी दिली. निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन भाजपाकडून करण्यात आलं होतं. मात्र, मविआनं नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक झाली. यासंदर्भात आज मतमोजणीच्या दिवशी अश्विनी जगताप यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“निकालाबाबत फार उत्साह वाटत नाही”

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे निकालाकडे बघताना फारसा उत्साह वाटत नसल्याची प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिली आहे. “मला आज साहेबांची (लक्ष्मण जगताप) खूप आठवण येतेय. निकालाकडे बघताना तसा फार उत्साह नाही. पण लोकांना न्याय द्यावा, त्यांच्या पाठीवर हात फिरवणारं कुणी असावं, त्यांची कामं वेळच्यावेळी व्हावीत, त्यांना भक्कम आधार देणारं कुणीतरी असावं यासाठी खरंतर मी निवडणुकीसाठी उभी राहिले. ही साहेबांनी केलेल्या कामाची पावती आहे. भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी इथे येऊन मला पाठिंबा दिला, सभा घेतल्या. भाजपाचे आख्ख्या भारतातून कार्यकर्ते आले होते. त्यांना मी धन्यवाद देईन”, असं अश्विनी जगताप म्हणाल्या.

आणखी वाचा – रूपाली ठोंबरे पाटील म्हणतात, “भाजपानं जाती-धर्मावर निवडणूक लढली, पैसे वाटले”

‘त्या’ फ्लेक्सबाबत अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण

दरम्यान, मतमोजणीच्या आधीच अश्विनी जगताप यांच्या विजयाचे फ्लेक्स चिंचवडमध्ये लागल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कार्यकर्त्यांनी भाऊंच्या प्रेमापोटी फ्लेक्स लावले आहेत. लक्ष्मण जगताप हे नाव महत्त्वाचं आहे. भाऊ परत आलेत असा विश्वास त्यांच्यात दिसतोय. त्यामुळे विजय साजरा करण्यासाठी त्यांनी फ्लेक्स लावले आहेत. १ लाख मतांनी मी निवडून येईन असं मला वाटतंय”, असं त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – कसब्यात विजयासाठी ६५ हजारांचा जादुई आकडा

“इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं”

अश्विनी जगताप यांनी टीव्ही ९ शी बोलताना विरोधकांवर सूचक शब्दांमध्ये टीका केली. “ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लक्ष्मण जगताप यांनी तेवढा विकास केला आहे. त्यांच्या अकस्मिक जाण्यामुळे ही निवडणूक लागली. इतक्या लवकर निवडणूक लागेल असं वाटलं नव्हतं. विरोधकांनी फॉर्म भरल्यामुळे आमच्या सगळ्यांवर भार पडायला लागला. बिनविरोध झाली असती निवडणूक तर चांगलं झालं असतं”, असं अश्विनी जगताप यावेळी म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad assembly by election vote counting ashwini jagtap pmw