पिंपरी- चिंचवड: अजित पवार गटातील माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. भोईर हे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. ते निवडणूक कुठल्या पक्षातून लढणार हे येत्या २ ऑक्टोबर रोजी निर्धाळ मेळावा घेऊन स्पष्ट करणार आहेत. घराणेशाही आणि झुंडशाहीला मी झुकणार नाही. माझ्यावर अन्याय झाला असून माझ्यासाठी सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत. असा इशारा पत्रकार परिषदेतून भोईर यांनी दिला आहे.
हेही वाचा : चिंचवड विधानसभा : जगताप कुटुंबीयांची कोंडी; भाजपमधून ‘या’ दोन माजी नगरसेवकांचा विरोध, २० ते २५ नगरसेवक…
भाऊसाहेब भोईर म्हणाले, जून महिन्यापासून मी विधानसभेची तयारी करत आहे. आत्तापर्यंत एक लाख लोकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम असून आगामी चिंचवड विधानसभा लढणार असल्याचे भोईर यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटातील चार ते पाच माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन चिंचवड विधानसभा लढण्याची आग्रही भूमिका घेतली. त्यानंतर आता अजित पवार गटातील भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन चिंचवड विधानसभा लढण्यावर भर दिला आहे. अजित पवार गटात देखील दोन गट आहेत का? यानिमित्ताने प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादीने वेळोवेळी मला डावलले असून आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे भोईर म्हणाले. मला सर्व पक्षांचे दरवाजे उघडे आहेत, असे म्हणत त्यांनी बंडखोरी करण्याचा आणि पक्षाला रामराम ठोकण्याचा इशारा दिला आहे. २ ऑक्टोबर रोजी भोईर हे निर्धाळ मेळावा घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.